Your Own Digital Platform

मित्रांसोबत फिरायला गेलेल्या धावडेतील युवकाचा मृत्यू


पाटण : मुंबई येथे मित्रांसोबत फिरायला गेलेल्या मोरगिरी विभागातील धावडे, (ता. पाटण) येथील एका युवकाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडल्याने पाटण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, धावडे येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये राजेंद्र विष्णू रोकडे (वय 30, रा. धावडे) याचा मृतदेह आढळून आल्याची फिर्याद यशवंत कृष्णा रोकडे (वय 69) यांनी पाटण पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पाटण पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, मोरगिरी विभागातील धावडे गावातील राजेंद्र विष्णू रोकडे (वय 30) हा गावातील इतर तीन मित्रांसोबत मोरगिरी येथील मोहम्मद मुकादम यांची खासगी गाडी घेऊन दि. 30 रोजी सकाळी 11 वाजता मुंबईला फिरायला गेले होते. 

त्याठिकाणी मौजमजा केल्यानंतर सायंकाळी जेवण झाल्यानंतर ते एका हॉटेलमधून बाहेर येत असताना हॉटेलच्या पायर्‍यांवरून राजेंद्र रोकडे हा युवक कोसळल्याने तो किरकोळ जखमी झाला होता. त्यामुळे इतर मित्रांनी त्याला गाडीमध्ये झोपविल्यानंतर सर्वांचा पाटणला परतीचा प्रवास सुरू झाला. पाटणच्या दिशेने येत असताना गाडी उंब्रजजवळ आली असता राजेंद्र रोकडे याचा गाडीतच मृत्यू झाल्याचे इतर मित्रांच्या लक्षात आल्याने ते चांगलेच घाबरले. त्यांनी त्याच अवस्थेत राजेंद्र रोकडेचा मृतदेह मोरगिरी विभागातील धावडे येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवून ते पसार झाल्याची मोरगिरी विभागात चर्चा आहे.

दरम्यान, धावडे येथील संदीप कोळेकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरूवार दि. 31 रोजी 8.30 वाजण्याच्या पूर्वी राजेंद्र रोकडे याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती गावातील लोकांना समजल्यानंतर यशवंत रोकडे यांनी या घटनेची फिर्याद पाटण पोलिसात दिली. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानुसार या घटनेची आकस्मित निधन म्हणून पोलिसात नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र रोकडे याच्या मृतदेहाचे पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार के. टी. गोतपागर करत आहेत.