Your Own Digital Platform

तांत्रिक क्षेत्रातील कामगिरीमुळे भारत महासत्ता होईल : प्रा. विजय नवले


सातारा: आवड, क्षमता आणि पात्रता ही करिअरची त्रिसुत्री आहे. पैसा कोणत्या क्षेत्रात मिळतो? यापेक्षा कर्तृत्व कोणत्या क्षेत्रात दाखवता येईल याचा विचार करुन करिअरची निवड करावी. उद्योजकता आणि संशोधन या क्षेत्रामध्ये भारतीय तरुणांनी कामगिरी केल्यास भारत आर्थिक दृष्ट्या बलवान होवू शकेल, असे मत करिअर मार्गदर्शन, पीसीईटी व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे प्रा. विजय नवले यांनी व्यक्‍त केले. संजय घोडावत युनिर्व्हसिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ, पुणे, असोसिएट स्पॉन्सर्स विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट पुणे. को-स्पॉन्सर्स चाटे ग्रुप शिक्षण समूह, मराठवाडा मित्र मंडळ, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ प्रदर्शनात ‘बारावी सायन्स नंतरचे करिअर व प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन’ या विषयावर ते बोलत होते.

प्रा. विजय नवले म्हणाले, बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मेडिकल, आर्मी, नेव्ही, संशोधन व इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी आहे. परंतु, करिअरचे अनेक मार्ग उपलब्ध असले तरी आपण कोणत्या क्षेत्रासाठी सक्षम आहोत हे प्रथम ठरवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी जी शाखा निवडायची आहे त्या शाखेसाठी स्वत:ची क्षमता ओळखली पाहिजे. फक्त पैशासाठी शिक्षण घ्यावयाचे नाही. कारण श्रीमंत देशात श्रीमंत विचार राहतात. देशाला श्रीमंत करण्यासाठी चांगले करिअर निवडणे महत्वाचे आहे. मेडिकल, आर्मी, नेव्ही, इंजिनिअरींगच्या क्षेत्रात अनेक शाखांमध्ये संधी आहे.

कोणत्याही क्षेत्रात अ‍ॅडमिशन घेताना त्या क्षेत्राला भविष्यात किती स्कोप आहे हे पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांला त्या क्षेत्रात किती रस आहे हे पाहून प्रवेश घेतला पाहिजे. सद्यस्थितीत संशोधन क्षेत्रातही चांगला वाव आहे. त्याबरोबर इंडस्ट्रीयल इंजिनिअरींगमध्येही अधिक वाव आहे. यावेळी प्रा. नवले यांनी इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली.