Your Own Digital Platform

जिल्ह्यात ईद उत्साहात


सातारा : मुस्लिम बांधवांचा ईद -उल -फितर (रमजान ईद) हा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सातारा शहरातील विविध मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करुन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.एक महिन्याचे रोजा शनिवारी संपल्यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी ईद उत्साहात साजरी केली. रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व मस्जिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी ‘ईद मुबारक’ असे शुभेच्छांचे फलक लावण्यात आले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मुस्लिम बांधवांनी शहरातील विविध मशिदींमध्ये एकत्र जमून नमाज पठण केले.

सातारा शहरातील पोवईनाका मस्जिद, एस.टी. स्टँड मस्जिद, पोलीस हेडक्वार्टर मस्जिद, शाही मस्जिद, मर्कज (खड्डा मस्जिद), कसाब मस्जिद (गुरूवार परज), मदिना मस्जिद (शनिवारा), मक्का मस्जिद (बुधवारा), बेगम मस्जिद (माची पेठ), संगमनगर मस्जिद, पिरवाडी मस्जिद, मस्जिदे अक्सा (मंगळवारा) सत्वशीलनगर, चाँदतारा, कमाठीपुरा, इब्राहिमभाई जर्दा (जुनी एम.आय.डी.सी.), बिलाल (करंजे)कब्रस्तान मस्जिद, जामे मस्जिद, सदरबझार मस्जिद, मस्जिदे आयेशा, पापाभाई कॉलनी, वखार मस्जिद (एम.आय.डी.सी.) कोडोली येथे रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. या बांधवांनी इदगी देवून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

प्रत्येक मशिदीच्या परिसरात पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. रमजान ईद निमित्त बाजारपेठेतही विविध प्रकारची मिठाई व भेटवस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.