Your Own Digital Platform

पालखी सोहळा प्लॅस्टिक, थर्मोकोल कचरा मुक्त करावा: प्रशांत अवचट


फलटण : जुलै 2018 मध्ये येणार्‍या आळंदी - पंढरपूर ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्‍यांना देण्यात येणार्‍या अन्नदानामध्ये प्लॅस्टिक, थर्मोकोल पत्रावळ्या, द्रोण, कप वापरु नयेत. कारण त्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होते. त्यासाठी येत्या 3 वर्षात दोन्ही पालखी मार्ग प्लॅस्टिक, थर्मोकोल कचरा मुक्त करण्याचा प्रयत्न असून या मार्गावरील अन्नदान करणार्‍या सर्व सार्वजनिक तरुण मंडळे, गणेश मंडळे, वारकरी संप्रदाय भजनी मंडळे, शैक्षणिक संस्था, वारीतील दिंडी प्रमुख व शासकीय, जिल्हा परिषद अधिकार्‍यांनी या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याचे क्रिएटीव्ह थम पर्यावरण दक्षता कृती मंचचे पर्यावरण तज्ञ व प्रचारक प्रशांत अवचट यांनी केले आहे. 

या अभियानाची माहिती देण्यासाठी श्री.अवचट व त्यांच्या सहकार्‍यांनी एक बैठक नुकतीच येथील सावता मंदिरात आयोजित केली होती. त्यामध्ये अवचट बोलत होते. 

पर्यावरणाचा कृत्तिशील प्रचार म्हणून आम्ही विविध पर्यावरणप्रेमी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षात दोन लाख कापडी पिशव्यांचे वारकर्‍यांना वाटप केले आहे असे सांगून अवचट पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षात वारी मार्गावरील एक लाख विद्यार्थ्यांना व पालकांना प्लॅस्टीक व थर्मोकोल न वापरण्याची शपथ देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक पत्रावळ्या तयार करुन त्याचे वितरण व वापरुन झाल्यावर उष्ट्या खरकट्या पत्रावळ्या गोळा करुन त्याचे दोन महिन्यात कंपोस्ट खत त्या त्या गावालगतच करुन त्याचे खत परिसरातील शेतकर्‍यांना मोफत देण्याची योजना यावर्षी कृतीशील करीत आहोत. त्यासाठी वारीतील सर्व घटकांनी सहकार्य करावे व यासाठी ‘वारी मित्र’ म्हणून नोंदणी करावी, असे आवाहनही अचवट यांनी केले आहे. त्यांसाठी ज्यांना या अभियानात सहकार्य करायचे आहे त्यांनी चलभाष क्र.9423579681 व 9881049438 वर संपर्क साधावा.
यावेळी ‘अनुलोम’ चे पदाधिकारी, वारकरी संप्रदाय, ज्ञानेश्‍वरी पारायण समितीचे प्रमुख ह.भ.प.केशवराव जाधव महाराज, श्री.वसव, श्री.शरद भोंगळे, लोकजागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ आदींसह अनेक वारकरी उपस्थित होते.