Your Own Digital Platform

वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरणाचा अध्यादेश


सातारा : सातारा येथील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची कृष्णानगर येथील 25 एकर जागा विनाअट व विनामुल्य वैद्यकीय शिक्षण विभागास कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. त्याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी संबंधीत कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे.सातारा येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 रुग्ण खाटांचे संलग्नित रूग्णालय सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरता प्रथम जिल्हाधिकारी यांच्या ताब्यातील माहुली येथील गायरान जागा निश्‍चित करण्यात आली होती. परंतु ही जागा सातारा शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असल्याने महाविद्यालय व रूग्णालयाकरता गैरसोयीची आहे. त्यामुळे कृष्णानगर सातारा येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ पुणे यांच्या ताब्यातील जागा हस्तांतरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होवून जागेअभावी महाविद्यालयाचे घोंगडे भिजत राहिले होते. नुकतीच 29 मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या महाविद्यालयास मंजूरी देण्यात आली.

येथील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ पुणे यांची कृष्णानगर सातारा येथील 25 एकर जागा विनाअट व विनामूल्य वैद्यकीय शिक्षण विभागास कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे अवर सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांनी शुक्रवारी काढला असून तो शासनाच्या विविध विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवला आहे.सातारा येथे हे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. शासनाकडे पाठपुरावा केला होता.