पत्रकारांचा मेळा, हीच आमची आषाढी : डॉ. श्रीनिवास पाटील


मारूल हवेली :  सामान्य माणसाच्या सुख- दु:खात सहभागी होणाराच खरा पत्रकार असतो. बदलत्या काळातही पत्रकारांनी समाजमनाचे पत्र, मित्र आणि अस्त्र बनावे. पत्रकारांचा मेळा, हीच आमची आषाढी एकादशी, असे गौरवोद‍्गार सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी काढले. दरम्यान, पत्रकार भवन, पेन्शन योजना, प्रवास सवलत, संरक्षण कायदा याबाबतच्या पत्रकारांच्या मागण्यांवर तोडगा निघायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी राज्य व केंद्राकडे व्यक्‍त केली. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पाटण, जि. सातारा येथे पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा व जिल्हा, तालुका आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या सोहळ्यास आ.शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सारंग पाटील, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, विशस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, भाजपचे भरत पाटील यांच्यासह राज्यभरातून शेकडो पत्रकारांची उपस्थिती होती.

राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत पत्रकांराना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजच्या पत्रकारीतेपर्यंतचे विविध पैलू त्यांनी उलगडले. ते म्हणाले, राज्यभरातील पत्रकार यानिमित्ताने पाटणला एकत्र आले आहेत. पत्रकारांचा मेळा हीच आमची आषाढी एकादशी आहे. वृत्तपत्र चालवण्याची एक कला असून ती ज्याला जमते तोच यशस्वी होतो. पत्रकार हा समाजाचा अवयव आहे. मात्र, पत्रकारांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. सगळे एकत्र आल्यावर अशक्य असे काही नाही. मी बीडचा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहताना पत्रकार भवन उभारले आहे.

पत्रकारांना सोयी सुविधा पुरवण्याचे कार्य शासनाच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. पत्रकार हा समाजाच्या सर्व स्तरातून वावरत असतो. त्याला विविध प्रश्नांची जाण असते. ते प्रश्न सोडवण्यासाठी तो तळमळीने काम करतो. समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारी पत्रकारिता व पत्रकार टिकला पाहिजे. तो सक्षम झाला पाहिजे. यासाठी राज्यकर्त्यांसह प्रशासनाने त्यांच्या समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्याची पत्रकारिता मी जवळून पाहिली आहे. पाटणच्या भूमीत राज्यपाल झाल्यानंतर माझाही सत्कार प्रथमच होत आहे अन् त्याचे व्यासपीठ पत्रकारांचे आहे याबद्दल मला अभिमान वाटतो. आजही मी सिक्कीम येथून सातारा जिल्ह्यातील प्रतिभावंत पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्याकडून जिल्ह्याची माहिती घेत असतो. समाजाचा हा आरसा समाजाने, शासनाने, प्रशासनाने सांभाळला पाहिजे. सातारा जिल्हा पत्रकार संघाने व पाटण तालुका पत्रकार संघाने राबवलेला हा उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद‍्गारही त्यांनी काढले.

आ. शंभूराज देसाई म्हणाले, समाजाचे अनेक प्रश्न पत्रकारांच्या भूमिकेमुळे तडीस गेले आहेत. मात्र, त्यांच्याही प्रश्नांबाबत लवकर निर्णय झाले पाहिजेत. शिवशाही बसमध्ये प्रवासासाठी पत्रकारांना मोफत सवलत मिळावी, यासाठी शासनाकडे आग्रही राहू. पत्रकार संरक्षण कायद्याबाबत केंद्रस्तरावरून नकारात्मक भूमिका असल्याचे परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे. याबाबत आपण विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करू. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे शिष्टमंडळ घेवून आपण मुख्यमंत्र्यांना भेटू. सातारा जिल्ह्यात पत्रकार भवन होण्यासाठी सुरूवातीला पालकमंत्र्यांकडे आणि त्याहीपुढे जावून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही आ. शंभूराज देसाई यांनी दिली.
विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतही पत्रकार निष्ठेने काम करत असतात. सामाजिक वाटचालीत पत्रकारांची भूमिका महत्वाची असते. वार्ताहरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत.

संदीप देशपांडे म्हणाले, शिवसेना व भाजप एकमेकांशी भांडत बसले आहेत. त्यांच्याकडून पत्रकारांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. तुम्ही आमच्या बरोबर रहा. तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो.

एस.एम. देशमुख म्हणाले, केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याचे बिल मंजूर न करता खाली पाठवले आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकार अस्वस्थ आहेत. याबाबत राज्यातील आमदारांनी विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करावा. छोट्या वृत्तपत्रांवर, साप्ताहिकांवर संक्रांत आणण्याचा डाव शासनाने रचला असून त्या विरोधात जुलैमध्ये भव्य आंदोलन छेडले जाईल.

हरीष पाटणे म्हणाले, अधिस्वीकृती मिळण्यासाठी अनेक जाचक अटी असल्याने ग्रामीण भागातील पत्रकार अधिस्वीकृती कार्डपासून वंचित रहात आहेत. याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी. सातारा जिल्ह्यात जिल्हा पत्रकार भवन व्हावे, ही गेल्या अनेक वर्षांतील जिल्ह्यातील तमाम पत्रकारांची भावना आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधी आमदारांनी एकत्र येवून प्रशासनाला सूचना देवून शासकीय जागा उपलब्ध करून बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. सातारा जिल्हा पत्रकार संघाने आजपर्यंत गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा, दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबांना मदत, दिवंगत पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय, जिल्ह्यातील पत्रकारांसाठी भव्य आरोग्य शिबिरे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी तीव्र आंदोलने केली आहेत.

दरम्यान, राज्यातील आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका पत्रकार संघालाही यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रारंभी स्वागत शरद काटकर, दीपक प्रभावळकर, शंकर मोहिते, परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य, पाटण तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी केले. शरद पाबळे यांनी आभार मानले.

यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अरविंद मेहता, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, गोरख तावरे, शशिकांत पाटील, प्रा. रमेश आढाव, शशिकांत जाधव, साहिल शहा, ईलाही मोमीन, अशोक चव्हाण, विलास काळे हे जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य, सातारा जिल्ह्यातील अकराही तालुका पत्रकार संघांचे पदाधिकारी, शहर पत्रकार संघांचे पदाधिकारी, ग्रामीण पत्रकार संघांचे पदाधिकारी, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस अनिल महाजन, गजानन नाईक, बापू गोरे यांच्यासह राज्यातील पत्रकारांनी उपस्थिती नोंदवली होती. विठ्ठल माने व विद्या म्हासुर्णेकर यांनी सूत्रसंचलन केले. पाटण तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.

No comments

Powered by Blogger.