Your Own Digital Platform

सातार्‍यातील बागांच्या ठेक्यात गोलमाल


सातारा : सातारा नगरपालिकेकडून अमृत योजनेतून शहरातील बागांची सुमारे 5 कोटींची कामे सुरु आहेत. पुण्याच्या निसर्ग ठेकेदाराला गेंडामाळ गार्डन 6 लाख, पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले उद्यान सदरबझार 63 लाख, जरंडेश्‍वर नाक्यावरील करिआप्पा चौकातील गार्डन 32 लाख, आयुर्वेदिक गार्डन गोडोली 65 लाख, अशी कामे दिली आहेत. बागांचे क्षेत्रफळ, लागवड केली जाणारी झाडे आणि त्यासाठी कारावे लागणारे काम यांचा मेळ घातला तर या कामात कोट्यवधींचा गोलमाल झाल्याचे उघड आहे.

सातारा नगरपालिकेने केवळ पर्यावरण कर वसूल करण्यापुरतेच पर्यावरणाशी नाते ठेवले आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी फारसे काहीही न करणार्‍या नगरपालिकेची वृक्ष विभागाची बैठक कित्येक महिने तुंबली आहे. कामांचे विषय आलेले आहेत मात्र, ही बैठक घेण्यामध्ये कुठल्याच पदाधिकार्‍याला रस नाही. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सातार्‍याला सुमारे कोट्यवधींचा निधी जाहीर झाला आणि त्यानंतर लगेचच त्यासाठी आवश्यक असणार्‍या वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करुन बागांमध्येच बैठका घेण्याचा धडाका नगरसेवकांनी सुरु केला. या मीटिंगनंतर झाडांच्या गार सावलीत मस्त चमचमीत रश्यावर ताव मारत या बैठका पूर्वेकडील बागांमध्ये पार पडल्या. नगरसेवकांच्या या ‘नियोजना’ची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. मनोमीलनात विरोधकांना विचारात घेतले की सर्व काही आलबेल होत होतं. त्या दहा वर्षात बर्‍याच गडबडी आणि लडबडी झाल्या. तक्रारी, टीका झाली तरी त्यावेळी पर्याय नव्हता. आता नगरपालिकेची सूत्रे एकाच आघाडीच्या हाती आल्यानंतर शहरातील बागा पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

सातारा नगरपालिकेला अमृत योजनेतून 3 कोटी 37 लाखांचा निधी मिळाला असला तरी संपूर्ण प्रस्ताव 4 कोटी 50 लाखांचा आहे. जसे काम होईल त्यानुसार टप्प्याटप्प्याने हा निधी मिळत जाणार आहे. संपूर्ण शहर हिरवेगार व्हावे, स्वच्छ व ताजी हवा शहरातील नागरिकांना मिळावी, त्यांना स्वास्थ्य लाभावे, पर्यावरणाचे संतुलन रहावे, या उदात्‍त हेतूने केंद्र सरकारने अमृत योजनेतून हा निधी सातारा नगरपालिकेला दिला. तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या योजनेचाच भाग असलेला वृक्ष लागवडीचा आराखडा तयार करुन शासनाला सादर केला. या आराखड्यानुसार शहराच्या कुठल्या भागात कोणते वृक्ष लावण्यात येणार, याची नियोजनबद्ध आखणी आहे. आता बांधकाम विभाग मात्र सावली देणारे वृक्ष लावण्यात येणार असल्याचे सांगत असून या आराखड्याची माहिती दिली जात नाही. अमृत योजनेेच्या मंजूर झालेल्या निधीतून आराखड्यानुसार शहरातील रस्त्यांवर बीव्हीजी कंपनीच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत आहे. या कंपनीला 9 हजार झाडे लावण्यासाठी 1 कोटींचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीने 4 हजार 600 झाडे लावली आहेत. गेल्यावर्षी पावसाळा संपत आल्यावर वृक्ष लागवडीला सुरुवात केली.

पाणी न मिळाल्यामुळे त्याचा झाडांवर परिणाम झाला. काही झाडे मेली. झाडांभोवतील कुंपन घालायचे असतानाही तसा बंदोबस्त न केल्याने मोकाट जनावरांनी बरीच झाडे फस्त केली. आता पावसाळा सुरु होवूनही या ठेकेदार कंपनीकडून खड्डे काढायचेही काम सुरु नाही. अद्यापही निम्मे काम बाकी आहे. असे असताना ठेकेदारांची बिले मात्र वेळेवर निघाली. अशा परिस्थितीत कुठलाच पदाधिकारी पाठपुरावा करत नाही. स्वत:चीच कामे करण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.

शहरातील बागांच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आणि नेहमीप्रमाणे एकाच ठेकेदाराला सर्व बागांची कामे मिळणे हा नेहमीसारखा योगायोग पालिकेत पुन्हा घडला. पुण्याच्या ‘निसर्ग’ एजन्सीला तीन बागांची कामे मिळाली. या ठेकेदाराकडून सदरबझारमधील पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले उद्यानाचे 63 लाखाचे काम सुरु आहे. त्याचबरोबर याच भागातील करिआप्पा चौक (जरंडेश्‍वर नाका) परिसरात 32 लाखांची बाग विकसित करण्यात येत आहे. गोडोलीतील आयुर्वेदिक गार्डनमध्ये 65 लाखाची झाडे लावण्यात येणार आहेत. या गार्डनवर पूर्वीही लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

गेंडामाळ गार्डनवर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मागील पाच वर्षात 68 लाख खर्च करण्यात आले आहेत. त्यावेळी बागेत 12 लाखांचा फूटपाथ, 50 लाखांचा सिंथेटिक ट्रॅक, 3 लाखांचा लॉन, 3 लाखांची झाडे लावण्यात आली. पुन्हा या बागेत अमृत योजनेतून 6 लाखांची झाडे लावण्यात येणार आहेत. संबंधित बागेचे क्षेत्रफळ, लागवड करण्यात येत असलेल्या झाडांमधील अंतर, या एकूण कामावर ठेकेदाराला येणारा खर्च आणि नगरपालिकेने मंजूर केलेला खर्च यांचा मेळ घातला तर यामध्ये गोलमाल असल्याचे स्पष्ट होते. बागेतील कामांची अजितबात माहिती दिली जात नाही. प्रचंड टोलवाटोलवी केली जाते. एकमेकांकडे बोटे दाखवली जात आहेत. कुणी नागरिकांनी विचारणा केल्यास काही नगरसेवकांचा तीळपापड का होत आहे? निसर्ग ठेकेदाराच्या मागे नेमके कोण आहे? कोट्यवधींच्या योजनेचे अमृत कोण चाखत आहे? बागांच्या कामावर केलेल्या खर्चाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागरिक तसेच वृक्षप्रेमींतून होत आहे.