दिवशी घाटातून निघालाय... सावधान!


तळमावले : दिवशी ता. पाटण घाटातून निघाला असाल तर जरा सावधान, पावसाळा सुरु होणार आहे अशी धोक्याची घंटा द्यावी लागत आहे. कारण पावसाच्या पाण्याने ठिकठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण होणार आहे. गतवर्षी पावसाळ्यामध्ये बर्‍याचवेळा दरड कोसळली होती. त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बांधकाम विभागातर्फे दरड कोसळू नये म्हणून उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी होत आहे. ढेबेवाडी विभागामधून पाटणला जाण्याचा एकमेव मार्ग दिवशी घाटामधून आहे. त्यामुळे या रस्त्याने नेहमी वर्दळ सुरु असते. सरासरी बारा ते पंधरा किमी अंतराचा घाटमाथ्याचा रस्ता आहे. तीव्र उतार आणि वळणावळणाचा हा रस्ता आहे. डोंगरातून हा रस्ता जातो. त्यामुळे पावसाळ्यात हमखास दरड कोसळण्याचा धोका निर्माण होतो. कित्येकदा छोटे मोठे अपघात झाले आहेत. 

काही दिवसांपूर्वी ब्रेकफेल झालेल्या एसटीचा अपघात चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला. अचानक दरड कोसळल्यास असे अपघात रोखणे अशक्य आहे. या घाटामध्ये मान्सूनपूर्व पावसाने काही ठिकाणी आत्तापासूनच मोठे मोठे दगड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. दिवशी फाट्यापासून थोडे पुढे ढेबेवाडीच्या दिशेला एका वळणावरती डोंगरातून एक मोठा दगड रस्त्यावरती आला आहे त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वळण असल्याने हमखास अपघात होऊ शकतो. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत तो दगड रस्त्यातून बाजूला करावा अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. पावसाळ्यामध्ये दिवशी घाट साक्षात मृत्युचा सापळा बनतो. बर्‍याच ठिकाणी सुरक्षित कठडे बसविणे आवश्यक आहे तसेच ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे तेथे दरड कोसळू नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. तरच भविष्यात होणारे अपघात रोखता येतील.

No comments

Powered by Blogger.