Your Own Digital Platform

संपामुळे कराड आगारात शुकशुकाट


कराड : पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला आहे. त्यामुळे कराड बसस्थानकात दिवसभर शुकशुकाट होता. अचानक संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. अनेकांनी वडापचा आधार घेतला. या संपाचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी, व्यापार्‍यांचे नुकसान झाले. एसटी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, आदीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला.

संपामुळे रूग्ण, महिला, लहानमुले, वृध्दांचे प्रचंड हाल झाले. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणार्‍या नोकरदारांनाही कसरत करावी लागली. प्रवाशांना वडापचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे सर्वत्र वडाप व खासगी गाड्यांची दिवसभर चलती होती.

तारळे बसस्थानकात प्रवाशांचे हाल

एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे परगावी जाणार्‍या तारळे विभागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक प्रवाशांना संपाची कल्पना नसल्याने विभागातून वडाप वाहनाने प्रवाशी बसस्थानकात आली. बसस्थानकात वाहतूक नियंत्रक कक्षाला कुलूप असल्याने त्यांना ताटकळत रहावे लागले. इतर लोकांनी संपाची कल्पना दिल्यानंतर बाहेरगावी निघालेल्या प्रवाशांना आल्या पावली परत फिरावे लागले. महत्त्वाचे काम असणार्‍या प्रवाशांनी वडापचा आधार घेतला.आजच्या संपामुळे कोर्ट ,कचेरी व इतर कामासाठी परगावी जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले.

पाटण तालुक्यातील ग्रामीण भागावर गंभीर परिणाम

आपल्यावर होत असलेल्या अन्याय व दडपशाही विरोधात राज्यभर एस. टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला पाटण आगारातील कर्मचारी व संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संपामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. सुदैवाने शाळा, महाविद्यालये यांना सुट्ट्या असल्याने विद्यार्थी वर्गाला फटका बसला नाही.आपल्या विविध मागण्या व प्रश्‍नांबाबत एस. टी. कर्मचार्‍यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे.

यात पाटण आगारातील कामगार व इंटक संघटनांनी आपला शंभर टक्के सहभाग नोंदवला आहे. तर अपवादात्मक काही संघटना या संपात सहभागी झाल्या नाहीत. राज्य सरकार व प्रामुख्याने परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांच्या धोरणांविषयी प्रचंड नाराजीचा सूर या संपामध्ये उमटत आहे. फसवी पगारवाढ, कर्मचार्‍यांना राजीनामा देण्याबाबतचे दडपशाहीचे प्रयत्न, लेखी हमी मागतानाची हुकूमशाही आदी अनेक चुकीची धोरणे व मनमानीविरूध्द कर्मचार्‍यांचा उफाळून आलेला हा असंतोष यातील मुख्य कारणे आहेत.

दरम्यान या संपामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असल्याबद्दल संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. तर या संपाचा बाजारपेठा, व्यापारी, नोकरदार व सध्या शाळा, महाविद्यालये यांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम पहायला मिळाला. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर रोष व्यक्त करण्यात येत आहे.