Your Own Digital Platform

बालकामगारप्रश्‍नी तीन वर्षात फक्‍त तीनच कारवाया


सातारा : बालमजुरांच्या प्रश्‍नाबाबत आजही शासन आणि समाज हे दोघेही संवेदनहीन असल्यानेच बालकामगारांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. बालकामगार कायद्याची अंमलबजावणीच होताना दिसत नसल्याने आज अनेक ठिकाणी बालकामगार काम करताना दिसत आहेत. सातारा जिल्हाही याला अपवाद नाही. जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने बाल कामगार कार्यरत आहे. मात्र, सहाय्यक कामगार आयुक्‍त कार्यालयाला हे बालकामगार दिसत नाही का? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण गत तीन वर्षाच्या कालावधीत फक्‍त तीनच कारवाया केल्या आहेत. त्यामुळे आयुक्‍त कार्यालयाच्या समितीवर कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिन 12 जून रोजी पाळला जातो. पण वर्षातून एकदा बालकामगारांचा प्रश्‍न समोर येतो. 

सातारा जिल्ह्यात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने एप्रिल 15 ते मार्च 16 या वर्षात 8 धाड सत्रे टाकली. यामध्ये 83 धोकादायक उद्योगाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये 3 बालकामगार काम करताना आढळून आल्यानंतर त्यांना शाळा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. एप्रिल 16 ते मार्च 17 या वर्षात 8 धाडसत्र राबविण्यात आली त्यामध्ये 97 धोकादायक उद्योगाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये एकही बालकामगार आढळून आला नाही. तर एप्रिल 17 ते मार्च 18 या वर्षात 14 धाडसत्र राबविण्यात आली. त्यामध्ये 115 धोकादायक उद्योगाची पाहणी करण्यात आली त्यामध्ये एकही बालकामगार आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले.

कार्यालयाच्या समितीने दिलेल्या आकडेवारीवरून तीन वर्षात 30 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये तब्बल 295 उद्योगांची पाहणी केली. एवढी मोठी कारवाई करून फक्‍त 3 बालकामगार सापडले. हे म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार आहे. ज्या प्रकारे धाडसत्र टाकण्यात आले त्यावरून ते मॅनेज असल्याची शंका उपस्थित होत आहे. यामध्ये संबधित व्यवसायिक किंवा व्यापारी व समिती सदस्यांमध्ये आर्थिक देवाण घेवाण असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात वीटभट्टी, हॉटेल्स, गॅरेज, वेल्डींग दुकान, बेकरी, व अन्य दुकानासह, भेळपुरी, पाणीपुरी गाडे, आईसस्क्रीम गाड्यावर आजही बालकामगार मोठ्या संख्येने काम करताना दिसत आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. महिन्याला जिल्ह्यात 1 ते 2 ठिकाणी टास्क फोर्सच्या माध्यमातून धाडसत्र टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.