मसूर, उंब्रज परिसराला पावसाची प्रतीक्षा


कराड : राज्यातील विविध भागांसह कराड तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात एक जून ते 25 जूनच्या सकाळपर्यंत सरासरी 178 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. तर रविवार सकाळपासून सोमवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत केवळ 1 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मसूर, उंब्रज, कवठे परिसराला मात्र रविवारी पावसाने हुलकावणीच दिली होती. सोमवारी मात्र या भागाला पावसाने दिलासा दिला.गेल्या तीन दिवसांपासून पावसाने तालुक्यात पुनरागमन केले आहे. रविवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात तालुक्यात सहा मि. मि. पावसाची नोंद झाली होती. मात्र शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर ओसल्याचेच पहावयास मिळत होते. रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाला प्रारंभ होऊन सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत कराड शहरासह तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. सकाळी साडेसात वाजल्यापासून सुमारे तीन तास सलग कोसळणार्‍या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवनही विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळत होते. दरम्यान, रविवार सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ या चोवीस तासात कराड तालुक्यात सरासरी 1 मि. मि. पावसाची नोंद झाली. कराड, मलकापूर, सैदापूर, कोपर्डे हवेली मंडल विभागात कमी पावसाची नोंद झाली होती. रविवारी हुलकावणी दिल्यानंतर सोमवारी मात्र तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली होती.

दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच..


गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. रविवार सकाळपर्यंत मसूर, इंदोली, उंब्रज परिसरात 2 ते 4 मि. मि. पावसाची नोंद झाल्याने आता पावसाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र रविवारी पावसाने उघडीप दिली. त्यामुळेच सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षाच आहे.

No comments

Powered by Blogger.