Your Own Digital Platform

शॉक लागून जवानाचा मृत्यू


उंब्रज : घरातील नळाला इलेक्ट्रिक मोटार जोडत असताना शॉक लागून सुट्टीवर आलेले लष्करी जवान अमोल कृष्णात माने (वय 29) यांचा बुधवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. चरेगाव (ता. कराड) येथे ही घटना घडली असून जम्मू-काश्मीर येथील श्रीनगरमध्ये सैन्य दलाच्या 13 रेजिमेंट राष्ट्रीय रायफल विभागात ते कार्यरत होते. दहा वर्षांपूर्वी अमोल माने हे लष्करात भर्ती झाले होते. 22 मे रोजी एक महिन्याची सुट्टी काढून ते गावी आले होते. माने यांच्या घराच्या नळाला मोटार जोडून पाणी भरले जात असे.त्यामुळे बुधवारी सकाळी अमोल माने नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक मोटार जोडत होते. त्याचवेळी त्यांचा मोटारीला स्पर्श होताच त्यांना जबर शॉक लागला. यावेळी माने यांनी केलेला आरडाओरडा ऐकून शेजारील लोकांनी धावत येऊन लाईट बंद केली.

त्यानंतर जखमी अवस्थेत माने यांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार वेळ झाला होता.अमोल माने हे पदवीधर असून ते दहा वर्षांपासून सैन्य दलात 13 रेजीमेंट राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. अमोल यांची लहान बहीण पदवीधर असून तिच्या लग्नाची जबाबदारी अमोल यांच्यावर होती. वडील शेतकरी असून त्यांनाही अमोल यांचा मोठा आधार होता. शेतीची आवड असल्याने अमोल सुट्टीवर आल्यानंतर शेती कामात वडिलांना हातभार लावत असत.

त्यांच्या आकस्मिक निधनाने चरेगांवसह परिसराला धक्का बसला असून घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज होते डोहाळे जेवण...

अमोल यांचा चार वर्षापूर्वी विवाह झाला होता. 9 जून रोजी अमोल माने यांचा वाढदिवस होता. तसेच त्यांच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गुरुवारी होणार होता. या कार्यक्रमाची घरात तयारी सुरू असतानाच काळाने अमोल माने यांच्यावर काळाने घाला घातला.