बदल्यांमुळे कराड तहसीलचे अधिकारी गायबकराड : ‘झिरो पेंडन्सी’ कामकाजाबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेणार्‍या कराड तहसील कार्यालयात बदल्यांचे वारे वाहू लागल्याने बहुतेक विभागातील कामांचा पुरता विचका झाला आहे. अधिकारी जागेवर नाहीत, कर्मचारी काय काम करतात कळत नाही, यामुळे सामान्य जनता पिचली असून एकही काम धड मार्गी लागेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तहसील कार्यालयातील कामकाजात कमालीचा विस्कळीतपणा आला आहे. पहावे तेंव्हा अधिकारी गायब. कोण रजेवर, कोण सुट्टीवर आणि कोण कामावर हेच कळत नसल्याने सामान्य जनतेचे प्रचंड हाल सुरू आहेत. यातच कर्मचारी, तलाठी, मंडल अधिकारी यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. काही अद्याप मिळालेल्या जागी हजरही झालेले नाहीत. तहसीलदार, नायब तहसीलदार बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.

 त्यामुळे महसूलच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. बारावीचा निकाल जाहिर झाल्याने विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी तहसील कार्यालयात होत आहे. मात्र त्यांची दाद घेणार कोण हा प्रश्‍न आहे. ऑनलाईन सातबारा उतार्‍यातही अनेक त्रृृटी राहिल्या आहेत. त्याची दुरूस्ती करण्यासाठी संबंधित खातेदाराकडून दुरूस्तीसाठी नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत. चुका प्रशासनाच्या त्रास मात्र सामान्य जनतेला भोगावा लागत आहे.ऑनलाईन सातबारा संगणकीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण असे महिनाभरापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र त्या कामालाही खो बसला आहे. त्यामुळे लोक अक्षरशः त्रस्त झाले आहेत, पण त्यांनी दखल घेण्यास अधिकार्‍यांना वेळ नाही.

सध्या तहसीलदार राजेंद्र शेळके बदलीच्या वाटेवर आहेत. योग्य ठिकाणी पोस्टिंग मिळावे म्हणून ‘वरिष्ठ’ पातळीवर त्यांची धडपड सुरू आहे. ते या दोन महिन्यात सातत्याने रजेवर जात आहेत. मागील महिन्यात ते रजेवर गेले होते. या कालावधीत त्यांचा चार्ज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी दशरथ काळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पण ते चार दिवसांतून कधीतरी कार्यालयात दिसून यायचे. या कालावधीत त्यांनी एकाही महत्त्वाच्या दस्तऐवजावर सही केली नाही की, येथील कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवले. त्यामुळे कराड तहसीलचा कारभार रामभरोसेच होता. सध्याची परिस्थितीही याहून वेगळी नाही.

ऑनलाईन सातबाराचे तीन -तेरा..

बारा दिवसांपासून सातबारा संगणकीकरणाचे काम ठप्प आहे. सर्व्हर डाऊन असल्याने सांगितले जात आहे. त्यामुळे खरेदी -विक्री व्यवहारावर परिणाम झाला आहे. ऑनलाईन उतारे मिळत नाहीत. बदली प्रक्रिया सुरू असल्याने तलाठी हस्तलिखीत उतारे देत नाहीत. विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाहीत. बोजा चढवणे, कमी करणे ही कामे वेळेत होत नाहीत. प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शालेय विद्यार्थी व शेतकरी भरडला जात आहे. मंगळवारी सातबारा संगणकीकरणाचा सर्व्हर सुरू झाल्याचा संदेश आला. केवळ सातबारा, खातेउतारा व फेरफार नकला देण्यात याव्यात अशा सूचना तहसील कार्यालयास प्राप्त झाल्या,मात्र प्रत्यक्षात तोही ओपन झाला नसल्याचे समजले.

No comments

Powered by Blogger.