Your Own Digital Platform

सातारा विकास आघाडीकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई : आ. शिवेंद्रराजे भोसलेसातारा : प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने विकासकामे करत असल्याचा डंका पिटविणारी सातारा विकास आघाडी विरोधकांनी सूचविलेली कामे हाणून पाडत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जात असून, साविआ शहराची स्वच्छता नव्हे, तर पालिकेची तिजोरी साफ करत असल्याचा आरोप आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.

सातारा पालिकेने सर्वसाधारण सभा एका महिन्यात घेणे बंधनकारक असतानादेखील नगराध्यक्ष यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. त्या कर्तव्यात कसूर करत आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ८१ चे उपकलम तीन अन्वये १५ दिवसांच्या आतील तारखेस सर्वसाधारण सभा घेण्याची कायद्यानुसार तरतूद करावी. तसेच नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आ. शिवेंद्रराजे यांनी यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यावेळी आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते, विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांच्यासह नगरसेविका लीना गोरे, मनीषा काळोखे, कुसुम गायकवाड, दीपलक्ष्मी नाईक, सोनाली नलवडे, शकील बागवान, अतुल चव्हाण, रवींद्र ढोणे, शेखर मोरे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, 'सातारा पालिकेत साविआकडून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याने नागरिकांचे आणि शहराचे मोठे नुकसान होत आहे. सर्वसाधारण सभेसाठी विषयपत्रिका काढताना विरोधी नगर विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडून सूचविलेले जाणारे जनहिताचे विषय वगळण्यात आले. सभागृहात विषयपत्रिकेवरील सर्व विषय बहुमताच्या जोरावर हुकुमशाही पद्धतीने तोंडी मंजूर म्हणून सभा लगेच गुंडाळतात. यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.' स्वच्छतेच्या नावाखाली घंटागाड्यांचे महिन्याला सुमारे १९ लाख रुपयांचे बिल काढण्यात आले आहे. यापूर्वी हेच काम स्थानिक घंटागाडीवाले करीत असताना त्याचे सरासरी महिन्याला पाच लाख बिले असायचे. यामुळे सत्ताधारी शहर साफ करीत आहे का पालिकेची तिजोरी. पालिका निवडणुकीत आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे त्याही पलीकडे गेल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली.