Your Own Digital Platform

काँग्रेसच्या आड येणार्‍यास आडवे करणार : जयकुमार गोरे


कराड/मसूर : आ. पृथ्वीराज चव्हाण हेच आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा सातबारा कोणी एकट्याने आपल्या नावावर आहे, असे समजू नये. आ. आनंदराव पाटील यांचा पक्ष, विचार आणि आपणही एकाच पक्षाचे आहोत. त्यामुळे आपला शत्रू कोण आहे? हे ओळखा, असे आवाहन करत काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनवणे आपले ध्येय आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आणि कार्यकर्त्यांच्या आड कोणी येईल, त्याला आडवा करणार असल्याचा इशारा देत आपण जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद आणि बळ देणारच, अशी ग्वाही आ. जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते धैर्यशिल कदम यांचा कराड उत्तरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मसूर (ता. कराड) येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. हिंदुराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, निवासराव थोरात, संपतराव माने, भीमराव डांगे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. गोरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात काँग्रेस संपवण्याचे पाप केले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच काँग्रेसचा शत्रू आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आघाडी धर्म पाळा असे काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितले जाते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळला जातो का? असा प्रश्‍न उपस्थित करत जिल्हा परिषदेचे सभापतीपद काँग्रेसला मिळू नये, यासह राष्ट्रवादीकडून काँग्रेससह कार्यकर्त्यांचे खच्चीकरण कसे केले जाते, याचा पाढाच आ. गोरे यांनी यावेळी वाचला.

जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा आणि जिल्हा परिषदेतही सत्तेत वाटा दिल्यास आघाडी योग्य होईल. अन्यथा सोयीची आघाडी काय कामाची? असा प्रश्‍न उपस्थित करत आ. आनंदराव पाटील, धैर्यशिल कदम यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी आणि आपण एकाच पक्षाचे, विचारांचे आहोत. त्यामुळे शत्रू कोण हे ठवण्याची वेळ आली आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण हेच आपले नेते आहेत. आ. आनंदराव पाटील यांनाही वडिलकीचा दर्जा देतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही हेच लक्षात ठेऊन विरोधकांकडून सुरू असलेल्या फूट पाडण्याच्या प्रयत्नांना बळी पडू नये, असे आवाहनही आ. गोरे यांनी यावेळी केले. तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण हे सांगतील, त्या कोणत्याही जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे आपण यापूर्वीच जाहीर केले असल्याचेही आ. गोरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी धैर्यशिल कदम, संपतराव माने, भीमराव डांगे, निवासराव थोरात, भीमराव पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

तर सांगाल त्या चिन्हावर निवडणूक लढू....

बारामतीकरांपासून फलटणकरांपर्यंत अनेकजण आले, पण आपण कोणालाही घाबरलो नाही. आ. आनंदराव पाटील यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी आपणास वडिलकीच्या नात्याने सल्ला दिल्याचे मानतो. त्यामुळे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या चर्चा करून त्यांनी परवानगी दिली, तर आपण वडिलकीचा सल्ला मानून ते सांगतील त्या चिन्हावर निवडणूक लढवू, असे सांगत आ. जयकुमार गोरे यांनी आपण आपली चिंता करत नाही. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांची जरूर चिंता करतो, असे सांगितले.

पक्षात लोकशाही आहे ना?

धैर्यशिल कदम यांनी केवळ कार्यकर्त्यांची भावना बोलून दाखवली. यात त्यांचे चुकले कुठे? उमेदवारी देणे सोपी गोष्ट आहे का? असा दावा केला जातो. मग मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत 14 जागांवर उमेदवार का मिळाले नाहीत? असा प्रश्‍न करत पक्षात कार्यकर्त्यांना मत मांडण्याचा अधिकार नाही का? पक्षात लोकशाही आहे ना? असे प्रश्‍नही आ. गोरे यांनी उपस्थित केले.