Your Own Digital Platform

कोयनेच्या पुनर्वसनाच्या सोडवनुकीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना


कोयनानगर :- राष्ट्रहितासाठी कोयना धरणाच्या निर्मिती साठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्या कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाले आहे. श्रमिक मुक्ती दल संलग्न कोयना धरणग्रस्त संग्राम संघटना यांच्या वतीने डाॅ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर येथे 23 दिवस प्रकल्पग्रस्त जनतेने आपल्या न्यायिक मागण्यांबाबत ऐतिहासिक ठिय्या आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कोयनेच्या पुनर्वसनाच्या विषयावर श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्टमंडळाला बैठकीचे आमंत्रण दिले.

दि 19 मार्च2018 रोजी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाच्या निवेदनाच्या अनुषंगाने कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंबंधी मंत्रालय स्तरावर उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसना संदर्भात समस्यांची वेगवान सोडवणूक आणि विकसनशील पुनर्वसन प्रक्रिया वेगवान करणे कामी स्थापन करण्यात आली आहे. हा जनतेने लढून मिळवलेला विजय आहे हीच खरी जनतेची ताकत आहे.

दरम्यान या ऐतिहासिक निर्णयाचे धरणग्रस्तांनी स्वागत केले असून धरणग्रस्तांच्या वतीने.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत दादा पाटील व आपर मुख्य सचिव मा. प्रवीण परदेशी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

दरम्यान कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली आहे त्याचे धरणग्रस्त जनतेने स्वागत केले आहे, परंतु या समिती मध्ये धरणग्रस्तांच्या आभ्यासु प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात आले पाहिजे म्हणजे शासन आणि धरणग्रस्तांचे प्रतिनिधी यांच्या मध्ये संवाद झाल्यास वर्षानुवर्षे रखडलेले कोयनेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील याबाबत सरकारने विचार करावा अशी मागणी धरणग्रस्त जनतेतून होत आहे.ही समिती स्थापन होणे महत्त्वाचे होते, आता कोयनेच्या पुनर्वसन संबंधी सर्व प्रश्न जलदगतीने सोडविणे सोपे झाले आहे, हा अध्यादेश काढण्याची ताकत जी कोयना धरणग्रस्त जनतेने दाखवली ती ताकत विकासनशील पुनर्वसन केल्याशिवाय थांबणार नाही.
-डॉ. भारत पाटणकर.