महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न पत्रकारांचा महा मेळावा


पुणे :- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील पत्रकारांचा भव्य मेळावा आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा सातारा जिल्हयातील पाटण येथे रविवार दिनांक २४ जून २०१८ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण समारंभास सिक्कीमचे राज्यपाल महामहीम श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. गिरीश बापट, मंत्री दिवाकर रावते, सातारचे पालक मंत्री मा. विजयबापू शिवतारे, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण, मा. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, राज्यमंत्री मा. अतुल भोसले, माजी मंत्री मा. विक्रमसिंह पाटणकर, मा.आ. शंभूराज देसाई, मा. आ नरेंद्र पाटील, मा. संदिप देशपांडे सरचिटणीस मनसे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस.एम.देशमुख, अध्यक्ष- मा. सिध्दार्थ शर्मा, मा. किरण नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासात तालुका अध्यक्ष व पत्रकांराचा मेळावा प्रथमच होत आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणार्‍या विविध प्रश्‍नांवर मेळाव्यात सखोल चर्चा होऊन पुढील दिशा नक्की केली जाणार आहे. तालुका अध्यक्ष व पत्रकांराचा हा मेळावा तालुक्याच्या ठिकाणीच व्हावा अशी परिषदेची कल्पना होती.पाटण तालुका पत्रकार संघानं या मेळाव्याचं यजमानपद स्वीकारण्याची तयारी दाखविल्यानंतर परिषदेने त्यास मान्यता दर्शवून २४ जून ही तारीख नक्की केली आहे.

हा मेळावा दोन सत्रात होईल.सकाळी दहा वाजता मेळाव्याचे उद्धघाटन होणार आहे.दुपारच्या सत्रात तालुका अध्यक्ष आपल्या भावना व्यक्त करतील व समारोप होईल. या मेळाव्यात 'ऑनलाईन मिडिया सेल'ची स्थापना करण्यात येणार आहे.युट्यूब चॅनल्स आणि वेबसाईट चालविणार्‍या पत्रकारांच्या प्रश्‍नावर देखील मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे.


पुरस्कार वितरण सोहळा

ग्रामीण भागात आदर्श कार्य करणार्‍या तालुका आणि जिल्हा संघाना गेल्या वर्षी पासून अनुक्रमे वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार दिले जात आहेत. २०१७ च्या या पुरस्कारांचे वितरण देखील या मेळाव्यात होणार आहे. २०१७ साठीचे हे पुरस्कार खालील तालुका पत्रकार संघांना यापूर्वीच जाहीर झालेले आहेत.


रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार :- बीड जिल्हा पत्रकार संघ.

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कर.


1) कोकण विभाग :- रोहा प्रेस क्लब ( रायगड जिल्हा)

2) पुणे विभाग :- पाटण तालुका पत्रकार संघ

( सातारा जिल्हा)

3) नाशिक विभाग :- अकोले तालुका पत्रकार संघ

( नगर जिल्हा )

4) अमरावती विभाग :- देऊळगाव राजा पत्रकार संघ

( बुलढाणा जिल्हा )

5) नागपूर विभाग :- कळमेश्‍वर तालुका पत्रकार संघ

( नागपूर जिल्हा )

6) औरंगाबाद विभाग:- भोकरदन तालुका पत्रकार

संघ ( जालना जिल्हा )

7) लातूर विभाग :- उदगीर तालुका मराठी पत्रकार

संघ ( लातूर जिल्हा )

8) कोल्हापूर विभाग :- आटपाडी तालुका पत्रकार संघ

( सांगली जिल्हा )


वरील तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेच्यावतीने कऱण्यात आले आहे.

मेळाव्यास उपस्थित राहणार्‍या तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण उपस्थित राहणार असल्याची आगाऊ माहिती परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांच्याकडं ९९२२९९९६७१ या क्रमांकावर किंवा पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष - शंकर मोहिते ९२२६९८४६६१, कार्याध्यक्ष- बाबासो सुतार ७७५६९५६६४६, सचिव- भगवंत लोहार ९७६६ १६३७३८, नितीन खैरमोडे - ९९७५८८०३९२, विलास माने- ९८२२८८१६४७ योगेश हिरवे- ९४२३८६५१०० महिला प्रतिनिधी- सौ. विद्या नारकर ९१३०३७५२०९ यांच्या क्रमांकावर कळवावी.नियोजनाच्या दृष्टीने ते आवश्यक आहे.मेळाव्यास उपस्थित राहणार्‍यांना १०० रूपये नोंदणी शुल्क भरावे लागेल.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटावर सह्याद्रीच्या निसर्ग सानिध्यात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण आणि कोयना नदीच्या प्रवाह शेजारी वसलेले पाटण शहर आहे. पुणे- कोल्हापूर हायवे ने सातारा- उंब्रज किंवा कराड येथून पश्‍चिमेला पाटणला जाता येते. तर कोकणातून चिपळूण- कुंभार्ली घाट मार्गे कोयना - पाटण असे येता येते.

मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासात तालुका पदाधिकार्‍यांचा असा मेळावा प्रथमच पाटण येथे होत असल्याने तालुका अध्यक्ष तसेच पदाधिकार्‍यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई, सातारा जिल्हा पत्रकार संघ सातारा, आणि पाटण तालुका पत्रकार संघाने केले आहे.

No comments

Powered by Blogger.