Your Own Digital Platform

कर्मचार्‍यांचे अघोषित काम बंद ; प्रवाशांचे अतोनात हाल


स्थैर्य, फलटण (प्रसन्न रुद्रभटे) : एस.टी. कर्मचार्‍यांनी काल मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारल्याने अनेक ठिकाणी बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तालुक्यातुन काल दुपारपर्यंत फक्त 8 एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. या संपामुळे फलटण तालुक्यातुन इतर ठिकाणी कामासाठी जाणारे व फलटण तालुक्यात कामासाठी येणार्‍या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. काहींनी प्रर्यायी व्यवस्था केली तर काही जणांना नाईलास्तव दांडी मारावी लागली आहे.

फलटण डेपोमधुन बारामती, पुसेगाव, शिंगणापुर, आसू, लोणंद, वेळोशी, साखरवाडी व स्वारगेट, पुणे या ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या होत्या. हा संप कोणत्याही संघटनेने पुकारला नसला तरी या संपास सर्व कर्मचार्‍यांचा उत्फुर्त प्रतिसाद असल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी दैनिक स्थैर्यशी बोलताना दिली. 

या बाबत अधिक माहिती अशी की एसटीच्या संपाबाबत कोणतंही अधिकृत पत्र देण्यात आलेलं नाही. एसटी कर्मचार्‍यांचा हा अधिकृत संप नाही, कल्पना न देता कर्मचारी कामावर गैरहजर राहिले आहेत. त्यांच्यावर प्रशासन योग्य कारवाई करेलच, असं सांगतानाच वेतनवाढ मान्य नसेल तर कर्मचार्‍यांनी औद्योगिक न्यायालयात जाऊन दाद मागावी, असं वक्तव्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. दरम्यान, एसटीचा संप मोडून काढण्यासाठी पोलिसांनी संपकरी कर्मचार्‍यांची धरपकड सुरू केली आहे. 

एसटी कर्मचार्‍यांनी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारल्याने अनेक ठिकाणी बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यापार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिवाकर रावते यांनी हे विधान केलं. कामगार संघटना समोर न येता कर्मचार्‍यांना अडचणीत आणण्याचं काम करत आहेत. कल्पना न देताच कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. कर्मचारी संघटनांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन द्यायला हवं होतं, असं सांगतानाच संपकरी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याबातची भूमिका प्रशासनच घेईल. मी अशा कारवाईचा कधीच विचार करत नाही. कर्मचार्‍यांचं नुकसान होऊ नये हीच माझी भूमिका असते, असं रावते यांनी स्पष्ट केलं. 
कामगार सेनेचा संपाला विरोध 

गेल्या 45 वर्षात एसटी कर्मचार्‍यांची पगार वाढ झाली नाही, तेवढी पगारवाढ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. त्यामुळे आजचा संप बेकायदेशीर आणि फसवा असल्याचं सांगत शिवसेनाप्रणित कामगार सेनेने या संपाला विरोध केला आहे.