Your Own Digital Platform

रहमत का महिना है रमजान!ये दुवा माँगते है हम ईद के दिन
बाकी ना रहे आप का कोई गम
आप के आंगण मे उतरे
हररोज खुशियाँ भरा चाँद
सदा हसते रहो जैसे हसते है फूल
दुनिया के सारे गम
आपको जाए भूल
चारो तरफ फैलाओ खुशियोंका गीत
इसी उम्मीद के साथ
यारो तुम्हे मुबारक रमजान ईद


हिंदूंना जसे पुराण आदरणीय व पवित्र वाटते तसे जगाच्या पाठीवर इस्लाम धर्माचा मानदंड असलेला मुख्य ग्रंथ म्हणजे कुराण. हा मुळ ग्रंथ अरबी भाषेत आहे. आचार्य विनोबा भावे यांनी देखील कुराणचा सखोल अभ्यास केला होता. जगातील सर्व भाषांमध्ये त्या ग्रंथाची भाषांतरे झालेली आहेत. यामध्ये दिवसातून पाच वेळा नमाज पढण्याचा आचार घालून देण्यात आला आहे. त्यावेळी प्रार्थना केली जाते. कृपाळू, कनवाळू परमेश्‍वराने कृपा करावी, भूतदया सर्वत्र पसरावी, हा त्यातील आशय.

इस्लाम हे केवळ धर्माचे नाव नाही, ती एक जीवनपध्दती आहे. मुस्लीम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर हे एका गरीब कुळात जन्मले. त्यांच्या दयाळू उदारतत्वाचा अखिल विश्‍वात प्रसार झाला. इस्लाम म्हणजे विचारांची बांधिलकी जपणारी, इस्लामी तत्वानुसार कृतीशील जीवन जगणारी, इस्लामच्या पाच तत्वाचं काटेकोर पालन करणारी, त्यानुसार प्रापंचिक आणि अध्यात्मिक जीवन जगणारी व्यक्ती म्हणजे मुस्लीम बांधव होय.इस्लामची पाच तत्वे पुढीलप्रमाणे आहेत. ती प्रमुख व मुलभूत मानली जातात परमेश्‍वर-अल्लाह हाच एकमेवाद्वितीय आहे. त्याशिवाय अन्य कोणीच परमेश्‍वर नाही. हजरत मोहंमद हे सर्वशक्तीमान अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. त्या अल्लाहचे उपदेश प्रमाण मानून आपण त्यांचीच आज्ञा प्रमाण मानावी. अन्य कोणत्याही गुलामगिरीतून मुक्त व्हावे व अन्य लोकांना मुक्त करण्यासाठी धडपड करावी. ‘जग सुखी तर मी सुखी’ या भावनेने वागावे. नमाज हे दुसरे तत्व आहे. अल्लाहच्या दरबारात सर्व लोक समान आहेत. नमाज पढण्यात समर्पणाची भावना आहे. ती त्या थोर सर्वश्रेष्ठ परमेश्‍वराची सेवा आहे. नमाज मनुष्याला षड्रिपूंपासून आणि खोट्या अहंकारापासून दूर ठेवतो. नमाज पढतांना अशी प्रार्थना करावी-‘हे परमेश्‍वरा, या चराचर जगताचा, सर्व सृष्टीचा सर्वेसर्वा तूच आहेस. आम्हा सर्वांचा आधार फक्त तूच आहेस’.

रमजानचे रोजे (उपवास) हे फार कडक असतात. सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत खाणे-पिणे तर दूरच पण काही मुस्लीम बांधव थुंकीपण गिळत नाहीत. रमजानचे उपवास करणारा हा अल्लाला फार आवडतो. परमेश्‍वर त्याचे सारे अपराध क्षम्य करतो, असे मानले जाते. आपल्या मनावर अंकुश ठेवून आदर्श जीवन कसे जगायचे? हे तत्वज्ञान त्यातून मिळते. अन्न, लैंगिक गरज, विश्रांती या मूलभूत गरजांवर ताबा मिळवून त्यातून अहंकार नाहीसा करण्याची क्षमता मिळते. अन्नावाचून भुकेला प्राणी कसा कासावीस होतो? त्याचाशी एकरुप व्हावे, त्यामुळे भूतदया भाव जागा होऊन भुकेल्यांना अन्नपाणी द्यायला पाहिजे, हा भाव जागा होतो. रोजे करण्याने शरीर शुध्द, पवित्र होऊन मन-शरीरावर राज्य करता येते. आरोग्याच्या दृष्टीने म्हणूनच त्याचे महत्व आहे. जकात-आपल्या कमाईतून गरजूंना दान देणे, द्रव्य देऊन त्यांचेही जीवन सुसह्य करणे. असे केल्याने अल्लाह आपल्याला बरकत देतो. त्यामुळे त्याचे प्रेम आशीर्वाद याचा लाभ होतो. हजयात्रा-हे पाचवे तत्व आहे. आपण सर्वजण त्या सर्वश्रेष्ठ परमेश्‍वराची लेकरे आहोत. लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत जगातील कोणत्याही भागात असो प्रत्येक सच्च्या मुस्लीमाने आपल्या जीवनात एकदा तरी हजयात्रा करावी. जगातील सर्व बांधवांची त्यामुळे भेट होईल, हे विश्‍वची माझे घर ही भावना दृढ होईल.

माणसाला परमेश्‍वर म्हणू नका. मनुष्य परमेश्‍वर नाही, तरीपण मनुष्य परमेश्‍वराच्या रुपापेक्षा काही निराळा नाही, ही या धर्माची शिकवण आहे. नमाज, जकात, रोजा अशा सत्वशील गुणाने वागून माणूस परमेश्‍वराजवळ बसण्याच्या योग्यतेचा होतो. साधू-संतांचे, प्रेषिताचे गुण त्याच्या ठायी येतात, असे मानले जाते.रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव नवीन कपडे परिधान करतात. घराची तसेच मशिदीची सजावट करतात. एकमेकांना ईद मुबारक देतात. या दिवशी आपले शेजारी-पाजारी, नातेवाईक ह्यांना घरी बोलवतात. त्यांना शिरखुर्मा खाऊ घालतात. अनेक जातिधर्माचे लोकही त्यात सहभागी होतात, शुभेच्छा देतात. लहान मुलांना भेट वस्तू व रोख रक्कम ईद्दी म्हणून दिली जाते. ईद साजरी करण्यामागचा मूळ उद्देश हाच असतो की, माणसा माणसात प्रेम व सदभाव असावा, सर्वांनी एकत्र नांदावे, परस्पराबद्दल ऐक्य व बंधुभाव वाढावा.पवित्र रमजान महिन्यात बोहरा समाजाचे लोकसुध्दा नमाजासाठी एकत्र येतात. नमाज अदा करताना दिवसभराच्या कष्टाने आलेला शीणही निघून जातो. या काळात अल्लाच्या नावाने केलेले पवित्र कार्य फलदायी असते. द्वेषभावना विसरुन नवीन जीवन सुरु होते. शरीर व मनाला उर्जा मिळते.

- इम्तियाज मुजावर, कुडाळ