Your Own Digital Platform

‘कॉलर’ खाली करत पवार-उदयनराजे भेटले


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व राष्ट्रवादीचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले पुण्यात एकमेकांना भेटले. एवीतेवी कधीही कॉलर वर करणारे राजे व सातार्‍यात आल्यावर त्यांचीच पुनरावृत्ती करणारे शरद पवार यांच्यामध्ये कॉलर खाली करूनच राजकीय गप्पा रंगल्या. पुण्याच्या शिंदे हायस्कूलच्या एका हॉलमध्ये शरद पवार व उदयनराजे रविवारी मांडीला मांडी लावून बसले. मात्र, पश्‍चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोल सांगता सभेच्या मंचावर उदयनराजेंनी दांडी मारलीच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा रविवारी पुण्यात होती. सातार्‍याच्या हल्लाबोल सभेला खा. उदयनराजे भोसले यांची हजेरी नव्हती. बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा देण्याचे कारण सांगून गांधी मैदानावरील सभेला उदयनराजेंनी दांडी मारली होती. नंतरच्या काळात भाजप व विशेषत: मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक वाढत चालली होती. उदयनराजे भाजपमध्ये जाणार अशाही बातम्या पिकू लागल्या होत्या. राजधानी महोत्सवाला मुख्यमंत्री येणार असे वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री आले नाहीत. या सर्व पार्श्‍वभूमीवर संभाव्य लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उदयनराजे कोणती रणनीती आखतात? याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

पुण्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा होती. या सभेला उदयनराजे मंचावर उपस्थित राहतील, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात सभेपूर्वी ते शिंदे हायस्कूलच्या हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना भेटले. शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये जावून उदयनराजे बसले. पवार व उदयनराजे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक कोट्याही झाल्या. दोघे खळखळून हसले. त्यानंतर सांगता सभेपूर्वी काढण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चात खा. उदयनराजे काही काळ सामील झाले. मात्र, शरद पवार यांची परवानगी घेवून ते तिथूनच माघारी फिरले. काही क्षणापूर्वी पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उदयनराजेंनी हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेच्या मंचावर मात्र दांडी मारली.