तीन कंपन्यांकडून बोगस खतांची विक्री


सातारा : जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत डेक्‍कन अ‍ॅग्रो सोल्युन प्रा. लि, वांझोळी (ता. खटाव), कोरोमंडल इंटरनॅशनल लि. खैरगाव (मध्यप्रदेश), झुआरी फर्टिलायझर्स लि. महाड (जि. रायगड) या तीन कंपन्यांची बोगस खते उघडकीस आणली. वाईत बावधन मार्गावर वृंदावन अ‍ॅग्रो सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस कंपनीच्या विना परवाना खत विक्रीप्रकरणी दोघांवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित कंपन्यांकडून लाखोंचा सुमारे 19 टन बोगस खताचा साठा जप्‍त केला.कृषी विभागाने शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथक स्थापन केले होते. या भरारी पथकाने जिल्ह्यातील खत विक्रेत्यांच्या दुकानांवर धाडी टाकून खतांचे नमुने परीक्षणासाठी घेतले होते. जप्‍त केलेल्या खतांच्या साठ्यावर संबंधित कंपन्या तसेच विक्रेत्यांना या कारवाईत सुमारे 2 लाख 27 हजारांचा दंड करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत नमुने घेतलेल्या खतांचे परीक्षण करण्यात आल्यावर संबंधित खते अप्रमाणित म्हणजेच बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते. प्रयोगशाळेच्या प्राप्‍त झालेल्या अहवालानंतर संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाई तालुक्यात पं. स.च्या कृषी अधिकारी जे. बी बहिरट यांनी ओढा-बावधन रस्त्यावर कारवाई केली. शेतकर्‍यांच्या बांधावर जावून कृषी विभागाचा खत विक्री परवाना न घेता वृंदावन अ‍ॅग्रो सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस कंपनीचे खत विक्री करताना दोघेजण आढळले. या कारवाईत पथकाने 1 लाख 13 हजाराचा मायक्रो बायोमिल व अ‍ॅग्रो केमिकल्सचा 7. 6 मेट्रिक टन साठा जप्‍त केला असून 1 लाख 13 हजार दंड केला. दंड वसुलीची प्रक्रिया सुरु आहे. याप्रकरणी धनाजी मधुकर चंदनकर, अवधूत महादेव गडदे यांच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक आर. एस. शेळके यांनी डेक्‍कन अ‍ॅग्रो सोल्युन प्रा. लि. वांझोळी (ता. खटाव) या कंपनीच्या खताचे अप्रमाणित नमुने आल्याने सुमारे 1.200 क्‍विंटल खत जप्‍त केले. विद्राव्य खत एनपीके, 12:61:00 ही खते ताब्यात घेवून कंपनीला 70 हजारांचा दंड करण्यात आला. ओंकार कृषी सेवा केंद्र, नांदगिरी (ता. कोरेगाव) या विक्रेत्याकडील कोरोमंडल इंटरनॅशनल लि. खसरा, इंडस्ट्रियल एरिया निरमाणी (जि. खैरगाव, मध्यप्रदेश) या कंपनीचे बोगस खत असल्याचे आढळून आले. अधिकार्‍यांनी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत या कंपनीच्या पीएसपी (दा) या खताचे नमुने अप्रमाणित आले. त्यामुळे या खताचा 11 मेट्रिक टन खताचा साठा जप्‍त करुन 86 हजाराचा दंड करण्यात आला.

शेतकरी कृषी सेवा केंद्र, रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे झालेल्या कारवाईत झुआरी फर्टिलायझर्स लि. महाड (जि. रायगड) या कंपनीचे खत बोगस असल्याचे आढळले. याही खताचे प्रयोगशाळेतील तपासणीचे नमुने अप्रमाणित आल्याने अधिकार्‍यांनी पीएसपी (दा) या खताचा 7.400 मेट्रिक टन साठा जप्‍त करुन 58 हजारांचा दंड केला. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्यासमोर झालेल्या सुनावीत दंडाची रक्‍कम सरकारी खजिन्यात भरण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द करा

बोगस, दुय्यम मिश्र खते उत्पादन व विक्री करणार्‍या कंपन्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नागपूर अधिवेशनात दिली होती. जिल्ह्यात तीन कंपन्यांकडून दुय्यम व बोगस मिश्र खते विकली गेल्याचे उघडकीस आले. मुद्देमाल जप्‍त करुन कंपन्यांना दंडही झाला आहे. बोगस बियाणांबरोबरच निकष्ट खतेही शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचे महापाप करणार्‍या संबंधित कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments

Powered by Blogger.