Your Own Digital Platform

कोळकीत विद्युत पोलवर बसूनच ठिय्या


विडणी : घरावरुन गेलेली विद्युत लाईन पुन्हा घरावरुन न नेता बाजूने न्यावी, या मागणीसाठी कोळकी ता. फलटण येथे असलेल्या अब्दगिरे वस्तीतील मानसिंग अब्दगिरे यांनी डीपी बसवलेल्या खांबावरच अनोख्या पध्दतीने वीज वितरणाचा निषेध करत ठिय्या मांडला. मागणी मान्य होत असल्याने अब्दगिरे यांनी खांबावरून उडी मारण्याचा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, महावितरणचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व स्थानिकांनी तोडगा काढल्याने व मागणी मान्य करण्यात आल्याने अब्दगिरे यांनी ठिय्या सोडला. 15 दिवसांपूर्वी फलटण तालुक्यात जोरदार वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. या पावसाचा फटका अब्दगिरे वस्तीलाही बसला होता. या वस्तीत मानसिंग अब्दगिरे राहतात. या पावसामुळे अब्दगिरे यांचे शेडचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. त्यांच्या जागेतच महावितरणचा ट्रान्सफर्मर आहे. या ट्रान्सफर्मरवरूनच मेन लाईनसह अन्य दोन लाईन अब्दगिरे यांच्या घराजवळून गेल्या आहेत.

तर एक लाईन घरावरून गेली आहे.पावसामध्ये लाईनच्या तारा तुटल्या व खांब पडले होते. घरावरून गेलेल्या लाईनमुळे धोका असून ही लाईन बाजूने न्यावी, अशी मागणी अब्दगिरे यांनी महावितरणकडे केली होती. याबाबत त्यांना अधिकार्‍यांनी ही लाईन बाजूला घेण्याचा शब्दही दिला होता. मात्र, ऐनवेळीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी पलटी खात पूर्वीप्रमाणेच वीज वाहिनीची लाईन बसवण्यात येण्यात असल्याचे सांगितले.

त्यावर अब्दगिरे हे ट्रान्सफॉर्मर बसविलेल्या खांबावर चढत शेवटचे टोक गाठले व तेथेच ठिय्या मांडला. अब्दागिरे यांच्या आंदोलनाची बातमी वस्तीवर वेगाने पसरताच तेथील रहिवाशी गोळा झाले. पोलीस प्रशासनास याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी व महावितरणच्या आधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलीस अधिकारी, महावितरणचे अधिकारी, स्थानिक रहिवाशी व त्यांच्या कुटूंंबियांनी त्यांची समजूत काढण्याचा व खाली येण्यासाठी प्रयत्न केले. परंतू अब्दागिरे यांनी कोणालाही दाद दिली नाही. अखेर बाळासाहेब कचरे यांनी यशस्वी मध्यस्थी केली. यावेळी अधिकार्‍यांनी तीन दिवसात ही लाईन बाजूने नेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यानंतरच अब्दगिरे खांबावरून खाली उतरले. यानंतरच सर्वांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.