साताऱ्यातील रिंकू ओसवाल खून प्रकरण; पतीला जन्मठेप


सातारा : माहेरहून सोने आणण्याच्या कारणावरुन पत्नी रिंकू उर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी भरत कांतीलाल ओसवाल (वय 31, रा. आयटीआय जवळ, गुलमोहोर कॉलनी, सातारा) याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधीश डी.ए.ढोलकिया यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, 2014 साली घडलेल्या घटनेनंतर सातार्‍यातील महिलांनी आक्रमक होऊन मोर्चा काढला होता. सुमारे चार वर्षानंतर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, भरत ओसवाल हा पत्नी रिंकू उर्फ भाग्यश्री व इतर कुटुंबियांसमवेत साताऱ्यात राहण्यास होता. लग्नावेळी रिंकूच्या माहेरच्या मंडळींनी कमी दागिने केले. यावरुन पती नाराज होता. ठरल्याप्रमाणे उर्वरित आठ तोळे दागिने घेवून येण्याच्या कारणावरुन भरत हा रिंकूचा छळ करत होता. तसेच लग्नाला सुमारे दोन ते तीन वर्षे झाली तरी तीला मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुनही भरत हा रिंकूशी वारंवार वाद घालत होता. याबाबतची माहिती रिंकू यांनी फोनवरुन कुटुंबियांना दिली होती.

भरत याच्याकडून दिवसेंदिवस रिंकूला त्रास देण्याच्या प्रमाणात वाढ होत होती. दि. 19 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री रिंकूला बहिणीचा फोन आला होता. फोनवर बोलत असतानाच भरत तेथे आल्याने, रिंकूने पती आल्याचे सांगत आपण सकाळी बोलू असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर जेवणखाण करुन रिंकू पतीसह बेडरुममध्ये गेली. याठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर भरत याने रिंकूचा गळा आवळला. गळा आवळल्याने रिंकू बेशुध्द पडली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरत याने रिंकूला त्रास होत असल्याचे सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे कुटुंबियांना सांगितले.

भरत व इतर नातेवाईकांनी रिंकूला बेशुध्द अवस्थेत सातार्‍यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर रिंकूचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती रिंकूच्या माहेरच्या मंडळींना समजल्यानंतर त्यांनी सातार्‍यात धाव घेतली. रिंकूचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून तो मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर गळ्यावरील व्रण निदर्शनास आले. रुग्णालयाने याबाबतची माहिती माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याला दिली. शाहूपुरीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक एस.एल. पांढरे हे कर्मचार्‍यांसमवेत त्याठिकाणी गेले. शवविच्छेदन केल्यानंतर रिंकूचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचे सांगण्यात आले. भरत यानेच रिंकूचा गळा दाबून खून केल्याची तक्रार रिंकूची आई चंदा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

पोलिस निरीक्षक पांढरे यांनी गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. या खटल्यादरम्यान वैद्यकीय अधिकारी, मृत रिंकूची आई, काका यांच्यासह 11 जणांची साक्ष झाली. साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरुन न्यायाधीश डि.ए.ढोलकिया यांनी भरत ओसवाल याला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. महेश. कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रॉसीक्युशनचे उपनिरीक्षक पी.के. कबुले, हवालदार सुनील सावंत, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, कांचन बेंद्रे, नंदा झांजुर्णे, शाहूपुरीच्या पैरवी अधिकारी रिहाना शेख यांनी मदत केली.

No comments

Powered by Blogger.