Your Own Digital Platform

त्यांना हवी मायेची ऊब... त्यांना हवा मदतीचा हात...


रेठरे बु : लहान असताना वडिलांचे छत्र हरपले, जग कळेपर्यंत आईची मायाही तुटली, नशिबाचे भोग संपले असे वाटत असताना त्यांना पोलिओ झाला, शाळेत जायच्या वयात हातात काठी घेवून ते गुराखी झाले. इतरांच्या सहकार्याने कसबस लग्न झालं, तीन मुली नशिबी आल्या. आज त्याही माहेरी गेल्या आहेत. घरदार विना पोरके झालेले पोटोळे दाम्पत्य गेली 30 वर्षे सायकलच्या साहाय्याने कराड येथे फिरून पोटाची खळगी भरत आहेत.

कधी मिळेल ना मिळेल तर कधी पाण्याबरोबर तर कधी अक्षरशःउपाशी राहून ते दिवस ढकलत आहेत.कॉटजचे वर्‍हांडा ही त्यांच्यासाठी रात्रीची नित्याची निवार्‍यांची जागा आहे.अंगावर फाटका कापडा,तर पांघरायला चादर घेवून कोणीतरी मायबाप येईल,ही आशा त्यांना आजही आहे.जगण्यासाठी त्यांची चाललेली धडपड काळजाला अक्षरशःपिळ आणणारी आहे.

कराड तालुक्यातील दुष्काळी भागातील प्रभाकर पाटोळे व सुलभा पाटोळे या दुदैवी दाम्पत्यांना नियतीने नेहमीच संघर्षाच्या दारात उभे केले आहे.प्रभाकर यांना जन्मजात पोलिओ झाला आहे.तर शेतात काम करताना वयाच्या 24 वर्षी डावा हातही त्यांचा मोडला आहे.अशा बिकट परिस्थितीत हातावर रोजगार करून मुलींची कशीबशी लग्न केली आणि पाटोळे दापत्यांनी गाव सोडले.

प्रभाकर जन्मजात शारिरीक विकलांग झाले असल्याने सायकलवर संसार थाटून गेल्या 30 वर्षापासून त्या दोघांची भटंकती सुरू असून सुलभा या दिवसभर सायकल ओढत असतात.फिरून कसं बसं दहा,वीस रू.जमवायचे दोन चपात्या आणायच्या, मिळाली भाजी नाही तर पाण्याबरेाबर त्या गिळायच्या आणि ना अंथरून ना पांघरून वेणूताई हॉस्पिटलच्या वराड्यात झोपी जायचं हा त्याचा दिनक्रम ठरलेला आहे.डोंगर पायथ्याशी वडीलोपर्जित थोडीशी शेती असून त्यात काय पिकत नायं.तिकडे जाताना घाटातून सायकल ढकलण्यासाठी मुलीला ते फोनवरून बोलवून घेत असतात. धावत, थकत आलेली मुलगी काम झालं की,सासरी जाते.माय लेकरांची रस्त्यावरील भेट म्हणजे मुलींसाठी रस्ताच माहेर ठरत आहे.

परमेश्‍वराची इच्छा असेल तसं राहायचे ही मनाशी खुणगाठ बांधून प्रभाकर व सुलभा आज जगण्यासाठी दोन हात करत आहेत.दारिद्य्राचे चटके सोसत,लहानपणा पासून नशिबी फक्त हालअपेष्टाशी त्यांनी केलेला संघर्ष वेदनादायी आहे.आम्हाला काय बी नको कोणीतरी अंथरून,पांघरून व अंगावर कापडा द्यावा ही अपेक्षा ते समाजाकडून करत आहेत.

पतीच्या पाठीशी ठाम राहिले

आमच्या घरीही गरिबी होती, प्रभाकर यांच्याशी वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झालं.आज उद्या परिस्थिती बदलेल म्हणून आशेने जगत राहिलो. तीन मुलींना जन्म दिला. त्या दिल्या घरी गेल्या आणि आम्ही वाट दिसेल तिकडे सायकल वळवू लागलो. ज्याच्याशी लग्न लावलयं त्याला सोडायचे नाही या विचाराने सुलभा हालअपेष्टा सोसत पती प्रभाकर यांच्या पाठीशी ठाम राहिल्या आहेत. हे सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या.