Your Own Digital Platform

एम,पी,एस,सी परिक्षेत माण तालुक्याचा झेंडा


म्हसवड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सप्टेंबर २०१७ मध्ये घेतलेल्या परिक्षेत पश्चिम महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच गाव म्हणून ओळख असणाऱ्यां माण तालुक्यातील पळशी गावातील नूतन खाडे हिची उपजिल्हाधिकारी ,विकास गंबरे याची उपायुक्त विक्रीकर विभाग ,प्रिंयका रवींद्र खाडे हिची उपायुक्त विक्रीकर विभाग तर तेजस गंबरे याची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली झाली असुन या ४ रत्नांनी 'चौकार' साधला आहे, एका गावात चार अधिकारी होणार पळशी हे महाराष्ट्रातील एकमेव गाव असल्याचे बोलले जात असुन या ४ ही यशस्वी परिक्षार्थींचे माण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभीनंदन केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां व नेहमीच दुष्काळाशी सामना करणाऱ्यां माण तालुक्यातील पळशी गावात शेकडो अधिकारी असुन त्यात अजुन त्यांच्या रूपाने भर पडली आहे, या सर्व यशस्वी रत्नांनी पळशीच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा रोवला आहे , त्यामुळे त्यांनी इतिहास निर्माण केला आहे , त्याबरोबर त्यांनी दुष्काळी भागातील तरूणांपुढे आदर्श निर्माण केला आहे .

पळशी येथील शेतकरी असलेले बाळासाहेब खाडे यांची कन्या कु.नुतन खाडे हीने अभियंत्रीकेच्या टेक्स्टाईल मधून बी.टेक ची पदवी प्राप्त केली आहे ,यापूर्वी तिची सुरूवातीला स्पर्धा परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक त्यानंतर नायब तहसीलदार म्हणून जालना येथे नियुक्ती झाली होती, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश आपोआप पायाशी लोळणा घेत त्या प्रमाणे नुतन ने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतील उपजिल्हाधिकारी हे सर्वोच्च शिखर प्राप्त केले आहे,आता तिचा प्रवास येथेच थांबणारा नसून आता यापुढे तिचे UPSC हे ध्येय असून त्यादृष्टीने तिची वाटचाल देखील सुरू आहे , नुतनचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर हा केंद्रिय पोलीस उपअधीक्षक तर लहान भाऊ सचिन हा तहसीलदार असुन त्यांनी घरातच प्रशासकीय त्रिकोण करून परिस्थितीवर मात केली आहे.

सौ.प्रियांका रविंद्र खाडे यांनी पुणे विद्यापीठामधून औषधनिर्माण शास्त्र शाखेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले . पहिल्या प्रयत्नातच तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली ,त्यानंतर लगेच एक्साईज इनस्पेक्टर म्हणून निवड झाली , परवा जाहीर झालेल्या निकालात तिची विक्रीकर उपायुक्त म्हणून निवड झाली आहे ,


विकास गंबरे याने मॅकेनिकल इंजिनिअरींग ची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले ,मागील महिन्यात त्याची विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली होती ,आणि नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्याची विक्रीकर उपायुक्त म्हणून निवड झाली आहे .


तेजस गंबरे याने २०१५ मध्ये बी.ई. सिव्हील मधून अभियंत्रीकेची पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रीत केले, दोन वर्षे कोणत्याही क्लासचा आधार न घेता स्वयंअध्ययनाला प्राधान्य देत घरीच अभ्यास सुरू केला ,पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली ,तेजसचे वडील ग्रामसेवक तर आई रयत संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षिका आहेत.


या सर्व रत्नांनी घवघवीत यश संपादन केल्याने पळशी बरोबर माण तालुक्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे ह्या परिक्षेत एक प्रकारे पळशी गावचा डंका पहावयास मिळाला असुन दुष्काळी भागातील तरूंणापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.


स्पर्धा परिक्षां देताना सातत्य ठेऊन कष्ट घेतल्यास यश हमखास मिळते तसेच या क्षेत्रात महिलांसाठी मोठ-मोठ्या संधी उपलब्ध असुन महिलांनी स्पर्धा परिक्षांकडे वळावे .

- कु. नुतन खाडे .
( उपजिल्हाधिकारी )