मळीचे पाणी पुरवणार्‍या ठेकेदारावर कारवाई करा


सातारा : मायणी येथे मळीमिश्रीत टँकरने पिण्याचे पाणी पुरवल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून त्यास जबाबदार असलेल्या ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत करण्यात आली.दरम्यान, अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सभेला दांड्या मारल्याने पदाधिकार्‍यांनी नाराजी दर्शवली.जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. सभेस उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, बाळासाहेब भिलारे, सुरेंद्र गुदगे, निवास थोरात, उदयसिंह पाटील, अर्चना देशमुख, सोनाली पोळ, सुनिता कचरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.मायणी येथे सध्या टँकरने पाणी पुरवठा असून संबंधित ठेकेदाराने मळीमिश्रीत टँकरने पाणी पुरवठा केल्याने सभेत सुरेंद्र गुदगे यांच्यासह अन्य सदस्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. सध्या जलयुक्त शिवार योजनेमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी कामे सुरु असून ही कामे पावसाच्या आधी पूर्ण करण्याच्या सूचना पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना दिल्या.जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीला विविध विभागाच्या जबाबदार अधिकार्‍यांनी दांड्या मारल्या होत्या. संबंधित विभागाने प्रतिनिधींना पाठवले होते मात्र पदाधिकार्‍यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला प्रतिनिधींना उत्तरे देता न आल्याने पदाधिकारी चांगलेच भडकले. पुढील सभेस जबाबदार अधिकार्‍यांनीच उपस्थित राहण्याच्या सूचना पदाधिकार्‍यांनी केल्या.

दरम्यान, विविध विभागाच्या महत्वाच्या धोरणात्मक शासन निर्णयावर चर्चा करण्यात आली. पाणी टंचाई, जलसंधारण, ग्रामीण पाणी पुरवठा , सामाजिक वनीकरण, वरिष्ठ भूवैज्ञानिक, उपवनसंरक्षक, वीज वितरण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, लघु सिंचन, लघु पाटबंधारे विभाग, राष्ट्रीय पेयजल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, संपूर्ण स्वच्छता अभियानाचा आढावा घेण्यात आला.दरम्यान, स्थायी समितीची सभा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या असल्या तरी ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली आहे अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यामध्ये प्रतिनियुक्तीवर अनेक कर्मचारी काम करत असून या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी भिमराव पाटील यांनी केली. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत अशा कर्मचार्‍यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी सोडण्याच्या सूचना पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना दिल्या.सभेत ग्रामविकास निधी, संजयनगर (शेरे) ता. कराड या महसूली गावामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे, तसेच पाझर तलावांच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली.तसेच प्रत्येक विभागवार कामाचा आढावा घेण्यात आला.

No comments

Powered by Blogger.