Your Own Digital Platform

लग्नाच्या वाढदिनीच काळाने त्यांना हिरावले


वेणेगाव :विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हडबडून गेलेले वर्णे गाव अद्यापही सुन्नच आहे. लग्नाच्या वाढदिनीच पती-पत्नींना त्यांच्या लेकरासह नियतीने हिरावून नेले असून, या घटनेने सारेच हेलावून गेले आहेत. लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी केलेले असंख्य फोन जेव्हा उचलले गेले नाहीत तेव्हाच लेकीच्या काळजात धस्स झालं अन् घडलंही तसंच विपरीत. हा आनंदाचा दिवसच या कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. दरम्यान, तिघांनाही एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला.

वर्णे, ता. सातारा येथे शनिवारी शॉक लागून काळंगे कुटुंबातील सुरेश पांडुरंग काळंगे (वय 48), पत्नी सौ. संगीता सुरेश काळंगे (वय 40) व मुलगा सर्वेश सुरेश काळंगे (वय 16) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेने कुटुंबासह आख्खा गाव शोकसागरात बुडाला आहे. रविवारी या तिघांवरही अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर या तिघांनाही जेव्हा भडाग्नी देण्यात आला तेव्हा उपस्थित सार्‍यांचेच डोळे पाणावले. सुरेश यांचा पुतण्या व भाचा यांनी त्यांना भडाग्नी दिला. यावेळचे वातावरण मन हेलावणारे होते. सुरेश यांची मुलगी व आई-वडिलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता.

या घटनेने काळंगे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काळाने या कुटुंबाची केलेली क्रूर थट्टा मनाला डागण्या देत आहे. सुरेश व संगीता यांच्या लग्नाचाही शनिवारी वाढदिवस होता. 22 वर्षांपूर्वी या दिवशी सनई चौघड्याचे सूर कानी आले असतील; मात्र हाच दिवस काल मात्र या कुटुंबासाठी काळा दिवस ठरला.

सुरेश काळंगे हे गेली 19 वर्षे मुंबई येथे सुरक्षा रक्षक सुपरवायझर म्हणून सेवा बजावत होते. सद्यस्थितीत ॠ4ड सिक्युअर अ‍ॅन्ड सोल्युशन इंडिया प्रा.लि.या कंपनीत साऊथ ब्रँच माटुंगा येथे सुपरवायझर म्हणून काम पाहत होते. मुलगा सर्वेश, मुलगी सुजाता यांना शिकवून मोठे करायचे त्यांचे ध्येय होते. आई-वडिलांची सेवेतही ते काहीही कमी पडून देत नव्हते. मुलगा सर्वेश याने जीवन कल्याण माध्यमिक विद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे दहावीची परीक्षा देऊन 85 टक्के गुण मिळवले होते. तर मुलगी सुजाता हिने पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण वर्णेत तर डिप्लोमाचे शेंद्रे येथे घेतल्यानंतर नुकतीच तिला शिरवळ येथे कंपनीत नोकरी मिळाली होती.

काही दिवसांपूर्वीच सुरेश आपल्या वडिलांना दवाखान्यात घेवून जाण्यासाठी गावी आले होते. शनिवारी सुरेश हे पत्नी व मुलासमवेत डोंगर शिवारातील शेतात गेले होते. सकाळी गेलेले हे कुटुंब सायंकाळपर्यंत घरी तर आले नाहीच शिवाय दिवसभर एक फोनही न झाल्याने सुरेश यांचे आई - वडील चिंतेत होते. सुरेश यांचा मावसभाऊ श्रीमंत काळंगे संध्याकाळी घरी आल्यानंतर आपल्याला वाटलेली काळजी आई - वडिलांनी त्यांच्याजवळ व्यक्त केली. याचदरम्यान शिरवळहून मुलगी सुजाता लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर फोन करत होती. मात्र, सकाळपासून आई- वडील फोन घेत नसल्याने सुजाता पुरती घाबरून गेली होती. त्यामुळे श्रीमंत काळंगे हे स्वत: शेतात गेले. त्यावेळी पाहिलेले दृश्य त्यांच्या काळजाचा ठोका चुकवून गेले. बांधावर या तिघांचेही मृतदेह पाहून ते हडबडून गेले. ओक्सा बोक्सी रडतच त्यांनी याबाबतची माहिती सुरेशचे चुलत भाऊ अशोक काळंगे यांना दिली. या ह्रदयद्रावक घटनेने अवघे समाजमन हेलावून गेले आहे.

नेमके काय घडले त्यावेळी...

सुरेश हे पत्नी संगीता व मुलगा सर्वेशसमवेत शेतात तार कंपाऊंडचे काम करत होते. या तिघांनी मिळून त्यासाठी दोन डांबही उभे केले. तिसरा डांब उभा केला जाणार होता. त्यासाठी या तिघांच्याही हातामध्ये लांबलचक तार होती. नेमक्या याचवेळी जवळच असलेल्या वीज पुरवठा करणार्‍या विद्युत वायरीला तारेचा स्पर्श झाला अन् सारेच विपरीत घडले. या तिघांचाही विजेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला होता.