Your Own Digital Platform

खंडाळा जुन्या टोलनाक्यावर बसचा टायर फुटला


खंडाळा : खंडाळा जुन्या टोलनाक्यावर रविवारी दुपारी कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या यात्रेकरूंच्या बसचा टायर फुटला. या अपघातात अशोक चव्हाण (वय 35) हा गंभीर जखमी झाला. सुदैवाने इतर अन्य प्रवाशांना कोणतीही दुखापत न होता सर्वजण बचावले. याबाबत मिळालेली माहिती अशी, मुंबईतील धारावी येथील महिलांचा एक गट देवदर्शनासाठी रवाना झाला होता. भीमाशंकर, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, शिर्डी, शनि शिंगणापूर, पंढरपूर येथील देवदर्शन करून रविवारी कोल्हापूरच्या अंबाबाईचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर कोल्हापूरकडून आळंदीकडे जात असताना या ट्रॅव्हल्सचा खांबाटकी टोलनाक्यावर अचानकपणे टायर फुटला. या परिस्थितीत चालकाने प्रसंगावधान राखत गाडी एका बाजूला घेऊन थांबवली.

टायर फुटून मोठा आवाज होताच गाडी भरावास घासत गेल्याने दगड माती महामार्गावर फेकली गेली. मोठया आवाजामुळे महामार्गावरील भैरवनाथ हॉटेलचे मालक नगरसेवक प्रल्हाद खंडागळे व कर्मचारी धावत घटनास्थळी पोहोचले . बसमध्ये सुमारे 44 महिला, 6 पुरुष व 8 मुले होती. सर्वांचा भितीने आरडाओरडा सुरू होता. तर अशोक चव्हाण हे प्रवासी गाडीच्या पुढच्या चाकाखाली अडकल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना इतरांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, दुपारी हा अपघात झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाची रूग्णवाहिका न आल्याने जखमींना तात्काळ पोलिस व्हॅनने रूग्णालयात दाखल करण्यात आले. खांबाटकी बोगदा ते शिंदेवाडी या 20 किलोमीटर च्या अंतरात नेहमी अपघात घडतात. मात्र, अनेकदा जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. खंडाळ्यातील खाजगी रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी हजर होतात. मात्र महामार्गावर सेवेसाठी असणारी रुग्णवाहिका बेपत्ता असते .