Your Own Digital Platform

सातारा : बनावट नोटा चालवणारे रॅकेट उद्ध्‍वस्‍त


सातारा :  दोनच दिवसांपूर्वी सांगलीत बनावट नोटा चालवणार्‍या गौस गब्बर मोमीन याला तसेच नोटा पुरवल्याप्रकरणी शुभम खामकर याला एलसीबीने अटक केली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी बाजारपेठेत 2 हजार व 500 रूपयांच्या बनावट नोटा चालवणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एलसीबीच्या टीमने 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 हजाराच्या 1 हजार 315, 500 रुपयांच्या 21 तर अर्धवट छापलेल्या 498 नोटा जप्त केल्या असून या नोटांची बाजारपेठेतील किंमत तब्बल 56 लाख 42 हजार 500 रूपयांच्या बनावट नोटा असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संदीप पाटील म्हणाले, याप्रकरणी गणेश भोंडवे रा. मोळाचा ओढा, अनिकेत प्रमोद यादव रा. नवीन एम.आय.डी.सी, अमोल अर्जुन शिंदे रा. गडकर आळी, सुनील देसू राठोड रा. मतकर कॉलनी, अमेय राजेंद्र बेलकर रा. मोळाचा ओढा आणि राहुल अर्जुन पवार यांना अटक करण्यात आली आहे. कोटेश्वर मंदिर परिसरात अनिकेत व अमोल हे दोघे बनावट नोटा चालवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या टीमने सापळा रचला. दुचाकीवर सतत फिरत असलेल्या या दोघांवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

यामध्ये अनिकेत याच्याकडे 500 च्या 21 बनावट नोटा आढळून आल्या. तर अमोलकडे 2 हजार रूपयांच्या 7 बनावट नोटा मिळून आल्या. याची चौकशी केली असता गणेश भोंडवे याने या नोटा चालवण्यास दिल्याचे अनिकेत याने सांगितले. यानंतर सपोनि विकास जाधव यांच्या एका पथकाने गणेश भोंडवे याचा शोध घेऊन त्याच्या घरावर छापा टाकला. घराच्या झाडाझाडतीमध्ये एका सॅकमध्ये 2 हजाराच्या 1 हजार 315 बनावट नोटा, तसेच अर्धवट छापलेल्या 498 बनावट नोटा मिळून आल्या. त्यानंतर भोंडवे याच्या माहितीवरून सुनील देसु, अमेय बेलकर आणि राहुल पवार यांची नावे समोर आली. या सर्वांना ताब्यात घेतले असून या सर्वांकडे 26 लाख 54 हजार 500 रूपयांच्या बनावट तर 29 लाख 88 हजार रूपये किमतीच्या अर्धवट बनावट नोटा अशा एकूण 56 लाख 42 हजार 500 रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच 1 लाख 33 हजार 500 रूपये किमतीची वाहने व मोबाईलही जप्त करण्यात आले आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.