Your Own Digital Platform

रामोशी समाजाचा समावेश अनुसुचित जमातीमध्ये करावा : सौ. प्रिया नाईक


मायणी : रामोशी समाजाचा आरक्षण हा महत्वाचा प्रश्न आहे .मात्र त्याचबरोबर समाजातील अज्ञान ,अंधश्रद्धा दूर करून समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे .रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करून तातडीने आरक्षणाचा लाभ द्यावा यासाठी लोकशाही मार्गाने चळवळ उभी करणे गरजेचे असून समस्त रामोशी समाजाने शिकावे संघटीत व्हावे व आपला विकास साधण्यासाठी एकजुटीने राहावे असे आवाहन स्वाभिमानी रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सौ. प्रिया नाईक यानी केले.
 
या संदर्भात सौ.प्रिया नाईक यांनी खटाव तालुक्यातील विविध गावोगावच्या रामोशी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांचा गाठीभेटी घेतल्या . त्या मायणी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होत्या .सदर वेळी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे, सदाशिव नाईक, शिवाजी शिरतोडे, सोमनाथ बोडरे, सौ. सुनीता जाधव, महेश जाधव, संजय पाटोळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते . 

सौ.प्रिया नाईक पुढे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य सोडता आंध्र ,कर्नाटक, तामिळनाडू राज्यात रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केल्यामुळे तेथील बांधवांना आरक्षणाचा लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली आहे .महाराष्ट्रात मात्र रामोशी समाजाची विदारक स्थिती आहे .महाराष्ट्रात देखील रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करून त्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा मागणी गेले अनेक वर्षे रामोशी समाजातील बांधव करत आहेत . मात्र त्याकडे शासन व समाजाने दुर्लक्ष केले आहे. रामोशी एक संघटीतपणे या मागणीसाठी पुढे येत नसल्याने रामोशी समाज दुर्लक्षित राहीला आहे ही वास्तव स्थिती लक्षात घेऊन अनेक वर्षांपासून काम करताना समाजासाठी ठोस स्वरूपाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी रामोशी महासंघाची स्थापना झाली आहे .

रामोशी समाजाचे दैवत उमाजी नाईक यांना शासनाने आद्यक्रांतीवीर घोषित करावे व रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये तातडीने आरक्षणाचा लाभ द्यावा यासाठी लोकशाही मार्गाने या संघटनेने चळवळ उभी केली असून अशा आशयाचे निवेदन सोमवार दिनांक अकरा रोजी जिल्हाधिकारी सातारा यांना रामोशी समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे .सदर वेळी जिल्ह्यातील सर्व रामोशी समाज बांधव उपस्थित राहावे असे आवाहन मधुकर पाटोळे यांनी केले .

यावेळी माजी पं. स .सदस्य मधुकर पाटोळे मार्गदर्शन करताना म्हणाले, रामोशी समाजातील सर्वांनी एकमेकांमधील वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढा उभा तरच न्याय मिळू शकेल. आरक्षणाच्या प्रश्नावर आत्तापर्यंत रामोशी समजातील अनेक बांधवांनी एकजूट बांधून लढा दिलेला आहे .एक महिला म्हणून या लढय़ाचे नेतृत्व सौ.सुप्रिया नाईक करत असून त्यांना रामोशी समाजातील सर्वांनी पाठबळ देणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना रामोशी समाजाच प्रमुख कार्यकर्ते सदाशिव नाईक ,म्हणाले सुशिक्षित झालेल्या युवक युवतींना रोजगार संधी उपलब्ध झाली पाहीजे, समाजातील व्यसनाधिनता दूर करण्याबरोबरच रामोशी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचा मानस या संघटनेच्या वतीने करण्यात आलाआहे.