Your Own Digital Platform

जिल्ह्यात एसटी सेवा सुरळीतसातारा : एसटी कर्मचार्‍यांचा संप अखेर शनिवारी रात्री मागे घेण्यात आल्याने सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आगारातील एसटी सेवा सुरळीत सुरू झाली. सर्व बसस्थानकांवर प्रवाशांची वर्दळ दिसून आली तर सातारा बसस्थानकात आरक्षणासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.गुरूवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. ऐन उन्हाळी हंगामात हा संप झाल्याने राज्यभर एसटीची सेवा ठप्प झाली होती. मात्र, संप मागे घेतल्यानंतर शनिवारी रात्रीपासूनच काही मार्गावर एसटी बसेस धावण्यास सुरूवात झाली. रविवारी पहाटे 5 वाजल्यापासून सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्‍वर, मेढा, पारगाव खंडाळा, वडूज अशा 11 विभागातून सर्वच्या सर्व मार्गावर एसटीची सेवा सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली. सर्वच्या सर्व बसस्थानकावर वरिष्ठ अधिकारी एसटी वाहतूकीवर नियंत्रण ठेवून होते.सातारा बसस्थानकात गेल्या दोन दिवसापासून शुकशूकाट जाणवत होता मात्र रविवारी सकाळपासूनच बसस्थानकांवर प्रवाशांची वर्दळ सुरू झाली दुपारनंतर स्वारगेटच्या विना थांबा विना वाहक फलाटावर प्रवाशांची गर्दी झाली होती.

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आलेले चाकरमणी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळा सोमवारपासून सुरू होत असल्याने बच्चे कंपनी सुट्टी संपल्याने परतीच्या मार्गाला आहेत त्यामुळे रविवारी दिवसभर सातारा बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप आले होते. पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी जसे प्रवाशी उपलब्ध होतील त्याप्रमाणे सातारा बसस्थानकातून जादा एसटी सोडण्यात येत होत्या.ग्रामीण भागातील नागरिकांना एसटीचा संप मिटला नसल्याची माहिती न मिळाल्याने प्रवाशी खाजगी वाहनांचा वापर करताना दिसत होते.

दोन दिवसांत सातारा विभागाला 1 कोटीचा फटका

एसटी कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने शुक्रवारी सातारा विभागातील एसटीच्या लांब पल्यासह ग्रामीण भागातील सुमारे 1 हजार 300 फेर्‍या रद्द झाल्या त्यामध्ये सुमारे 40 लाख रुपयांचा महसूल बुडाला तर शनिवारी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे सुमारे 2 हजार 500 हून अधिक फेर्‍या रद्द होवून सुमारे 65 लाख रुपयांचा महसूल बुडाला. गेल्या दोन दिवसात सातारा विभागाला 1 कोटीचा फटका बसला असल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली.