Your Own Digital Platform

रात्री 2 वाजता उदयनराजेंच्या नावाने घोषणा देण्याची प्रबळ इच्छा झाली!


सातारा : पाऊस पडत होता. रात्रीचा एक वाजला होता. साताऱ्यात तसे आम्ही नवखे. कोणी लॉजवालाही आम्हाला दार उघडून आसरा देत नव्हता. आता जायचे कोठे अशा चिंतेत आम्ही होतो. तेवढ्यात रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांचा ताफा थांबला. एक धिप्पाड व्यक्ती गाडीतून उतरली आणि जवळ आली. ते होते खासदार उदयनराजे भोसले अन्‌ आमची समस्या चुटकीरशी सुटली. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील संतोष टक्के आणि त्यांचे चार मित्र उदयनराजेंनी केलेल्या या मदतीने भारावून गेले.

वैभववाडी येथील संतोष टक्के व त्यांचे चार मित्र माऊलीच्या पालखीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते वाई येथील फडणवीस वाडा पहायला गेले. तेथे गेल्यावर महाबळेश्‍वर जायचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामुळे थोडा उशीरच झाला. साताऱ्यात मुक्कामासाठी आलेले संतोष टक्के यांना आलेले अनुभव सांगितले.

टक्के म्हणाले, वैभववाडीकडे परत जाण्याऐवजी आम्ही साताऱ्यात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यात आलो पण पहाटेचे एक वाजले होते. कोठेही राहण्याची सोय होत नव्हती. बसस्थानका समोरच्या रस्त्यावरील प्रकाश लॉज मधील मॅनेजरला उठवण्याचा प्रयत्न केला पण तोही उठला नाही. रात्रीचे एक वाजून 10 मिनिटे झाली. आम्ही हाताश होऊन थोडे बाजूला गेलो.

साताऱ्यातील निरव शांतता आम्हाला अस्वस्थ करत होती. त्यावेळी रस्त्याने व्हिआयपी नंबर असलेल्या गाड्यांचा ताफा आला. आम्ही रस्त्यावर उभे राहिलेलो पाहून त्यातील मधली गाडी पुढे जाऊन थांबली. थांबलेल्या गाडीकडे माझे लक्ष गेले तर गाडी मधून उतरत एक धिप्पाड देह यष्टी असलेली व्यक्ती माझ्या दिशेने येत होती. काही क्षणातच माझ्या लक्षात आले.

माझ्या दिशेने येणारी ती व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते होते उदयनराजे भोसले". आपसूक माझी पावले त्यांच्या दिशेने वळली, मान झुकली अन्‌ मी त्यांना नमस्कार केला. मी भांबावून गेलो. माझा हात हातात घेत त्यांनी आमची चौकशी केली. "आम्ही सिंधुदुर्गातून माऊलींच्या पालखीचे दर्शनासाठी आलो होतो, आता रात्री इथे थांबायचे होते, पण रूम मिळत नाही" माझं वाक्‍य पूर्ण व्हायच्या आत त्यांनी आपल्या पीए ला सूचना केली. "तुमची व्यवस्था सर्किट हाऊसवर करतो, खुशाल विश्रांती घ्या!" म्हणत आम्हाला सर्किट हाऊसला जाण्यास सांगून, येतो म्हणत आमचा निरोप घेऊन ते निघाले.

आम्ही सर्किट हाऊसवर पोहचताच आमची चांगली व्यवस्था झाली. रात्री दोन वाजता आमचा फोन वाजला. राजांच्या पीएंनी सर्व काही व्यवस्था ठीक आहे का, याची चौकशी केली. चांगल्या वातावरणात गादीवर निवांत पडूनही झोप लागत नव्हती. वाटत होते या क्षणी सर्किट हाऊसच्या गच्चीवर जाऊन आरोळी ठोकावी छत्रपती शिवाजी महाराजकी जय...उदयनराजे महाराजकी जय...!