Your Own Digital Platform

शेतकऱ्यांनी केली दुधाने आंघोळ ; 20 टक्के संकलन


कराड : कराड (जि. सातारा) तालुक्यात दूध बंद आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होऊ लागले आहे. पहिले दोन दिवस शासनाच्या निर्णयाकडे डोळे लाऊन बसलेल्या बळीराजाने अक्षरश: दुधाने आंघोळ केली. करवडी (ता. कराड) परिसरात सकाळी हा प्रकार घडला असून तालुक्यातील दूध संकलन तिसऱ्या दिवशीही जवळपास ठप्पच झाल्यासारखी स्थिती पहावयास मिळत आहे.

दूध बंद आंदोलनामुळे तालुक्यात दररोज होणारे 80 हजार लिटरचे दूध संकलन जवळपास ठप्पच झाले आहे. सोमवारपासून बुधवार सकाळपर्यंत 200 लिटरच्या घरात होणारे दूध संकलन केवळ 25 हजार लिटरपर्यंत मर्यादित राहिले आहे. यावरूनच दूध बंद आंदोलनास मिळालेला प्रतिसाद लक्षात येत आहे. एकीकडे अशी स्थिती असताना करवडी येथे शेतकऱ्यांनी घरातील दुधाने आंघोळ करत अनोख्या प्रकारे शासनाचा निषेध नोंदवला आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून विशेष म्हणजे स्वाभिमानी अथवा शेतकरी संघटनांचा कोणत्याही कार्यकर्त्याला याची माहिती नव्हती. त्यामुळेच शेतकरी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाल्याचेच चित्र पहावयास मिळू लागल्याचे बोलले जात आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या "दूध बंद' आंदोलनास कराड तालुक्यात दोन दिवस संयम ठेवत आंदोलन करण्याचा निर्णय यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणे सचिन नलवडे यांनी मंगळवारी सकाळी अडवलेले दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपवाद वगळता तालुक्यात कोठेच अनुचित प्रकार घडला नव्हता. मात्र त्यानंतरही तालुक्यात केवळ 17 ते 18 हजार लिटरच दूध संकलन झाले होते. तर बुधवारी सकाळी 40 हजार लिटर दुधापैकी केवळ 7 ते 8 हजार लिटर दुधाचेच संकलन झाले आहे.