दोन महिला ठार होऊनही अपघात दडपलाफलटण : गोंदवले, ता. माण येथे पौर्णिमेनिमित्त देवदर्शनासाठी जात अताना राजुरी, ता. फलटण येथील दोन महिलांना धर्मपुरी, ता. माळशिरस येथे भरधाव वेगाने आलेल्या इंडिका कारने धडक दिली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसर्‍या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान, दि. 28 जून रोजी अपघातात दोन महिला ठार झाल्याचा अपघात घडूनही पोलिसांनी चार दिवस तो का दडवला?असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

याबाबत नातेपुते पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गुरुवार दि. 28 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान पौर्णिमेनिमित्त गोंदवले येथे या महिला देव दर्शनासाठी निघाल्या असता वस्तीपासून थोड्या अंतरावर असलेल्या धर्मपुरी ता.माळशिरस येथे भोईटे वस्तीजवळ आल्यावर कार नं. एम एच 04-ई 9839 वरील चालक शिवाजी विठ्ठल काळे सध्या राहणार कोपरखैरणे (नवी मुंबई) ठाणे मूळ गाव आंधळी ता.माण जि. सातारा याची झोप लागल्याने या चालकाने इंदूबाई बापूराव निकम(वय 52) व मंगल दत्तू जाधव (वय 48 )दोघी राहणार (रायंदवाडी )राजूरी ता.फलटण यांना धडक दिली. यामध्ये इंदूबाई निकम या जागीच ठार झाल्या तर मंगल जाधव या उपचारादरम्यान मयत झाल्या. ही धडक एवढ्या जोरात होती की शंभर ते दीडशे फुटावर उसाच्या शेतापर्यंत या कारने महिलांना फरफटत नेले. यामध्ये निकम या जागीच ठार झाल्या तर जाधव गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कार चालक कार तिथेच सोडून पळून जात असताना त्याला तेथील ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून या भीषण अपघातात या दोन्ही महिला ठार झाल्या आहेत. या घटनेमुळे राजूरी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबतची फिर्याद दादासाहेब निकम यांनी दिली असून अपघाताची नोंद नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव देवकाते व हवालदार गोडसे तपास करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.