पालखी सोहळ्यावर विद्युत मनोर्‍यांचा प्रकाश


लोणंद : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी लोणंद मुक्‍कामी येत आहे. या काळात भाविकांना वीज, पाणी, आरोग्य, संरक्षण व वाहतूक आदी सुविधा देण्याची विविध विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. माऊलींच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असल्याचे खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांनी सांगितले. दरम्यान पालखी तळावर पुरेशा प्रकाशासाठी विद्युत मनोरेही उभारण्यात आले आहेत.माऊलींचा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी सचिन बारवकर , तहसिलदार विवेक जाधव गेले 15 दिवस विविध विभागांचे कामाचे नियोजन करुन आढावा घेत आहेत. येणार्‍या अडचणींची सोडवणूक तत्परतेने करण्यात येत आहे. माऊलींचा पालखी सोहळा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलेला असताना विविध खात्यांची कामे अंतिम टप्यात येऊन पोहचली आहेत. पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची दक्षता अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.

विवेक जाधव यांनी पालखीतळ, पालखी मार्ग, निरा दत्त घाट आदी ठिकाणी लोणंद नगरपंचायत, पोलिस खाते, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य खाते, वीज वितरण कंपनी, एस. टी. डेपो, दुरध्वनी, जिल्हा परिषद बांधकाम, पाणी पुरवठा, महसुल पुरवठा खाते, पंचायत समिती या खात्यांच्या वतीने करण्यात आलेल्या व राहिलेल्या कामांचा आढावा घेऊन वारकर्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

निरा नदी ते लोणंद या पालखी मार्गावर वाहतूकीला अडथळा होणार नाही यासाठी अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्याचे वतीने स्वागत करताना गोंधळ होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे, त्यासाठी योग्य ते नियोजन करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पाण्याचे टँकर भरण्यात येणार्‍या ठिकाणची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पाणी टँकर भरताना वाहतूक करून वितरीत करताना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. लोणंद मुक्काम काळात दिंड्या, वारकरी, भाविक, नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेशा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पुरवठा शाखेच्या वतीन रॉकेल वाटपाचे नियोजन स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत करण्यात आले आहे तर गॅस, पेट्रोल, डिझेल यांचाही साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच्या वाटपाचेही नियोजन केले आहे. एस. टी. च्या वतीने सातारा, खंडाळा, शिरवळ, फलटण, वाठार आदी ठिकाणाहून 100 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी खंडाळा रोड बिरोबा वस्ती, सातारा रोड गोटे माळ, फलटण रोड सरदेचा ओढा, शिरवळ रोड पाटील वस्ती या ठिकाणी तात्पुरते बस थांबे उभारण्यात आले आहेत. माऊलींच्या स्वागतासाठी सर्वच विभागांची तयारी झाली असून शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. लोणंद पालखी तळावर पुरेशा उजेडासाठी विद्युत मनोरे लावण्यात आले आहेत. तळावर मुरूम व कच टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. निर्मल वारी अंतर्गत येणार्‍या मोबाईल टॉयलेटचे ठिकाण निश्‍चित करून त्यासाठी पाणी, रस्ता, वीज यांची सोय करण्याचे नियोजन झाले आहे.पालखी तळावरील स्नानगृहांची दुरुस्ती करून ती सुरू करण्यात आली आहेत.

No comments

Powered by Blogger.