दहावीच्या 'त्या' बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला


कुडाळ : कुडाळ (ता. जावली) येथील ज्योती नंदकुमार पवार (वय १६) दहावीची विद्यार्थिनी काल दि. ८ रोजीपासून बेपत्ता होती. आज सकाळी तिचा मृतदेह सापडला. कुडाळच्या नदीपात्रात तिचा मृतदेह सापडला असून दहावीत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्‍ठी सापडली आहे.

सदर विद्यार्थिनीला दहावीच्‍या परीक्षेत ७७ टक्के गुण मिळाले होते. याबाबत अधिक माहिती अशी, ज्योती पवार या मुलीने दहावीची परीक्षा दिली होती. त्‍यात ती ७७ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली. दहावीचा निकाल लागल्यानंतर कमी गुण मिळाल्याने ती शांत होती. अशातच रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ती उठली. आज्जीला अंघोळीला पाणी दिल्यानंतर नळाचे पाणी भरते, असे सांगून घराबाहेर आली. मात्र, ती बराच वेळी परत न आल्याने कुटुंबीयांच्या लक्षात आले. ज्योतीचा शोध घेण्यास सुरुवात झाल्यानंतर कुटुंबीयांना घरामध्ये ज्योतीने लिहलेली एक चिठ्ठी सापडली. त्यांनी तत्काळ कुडाळ पोलिस चौकीत धाव घेवून घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.

कालपासून तिचा शोध सुरू असतानाच आज सकाळी कुडाळच्या नदीपात्रात तिचा मृतदेह सापडला. या आत्महत्येची नोंद कुडाळ पोलिसात झाली असून अधिक तपास तात्या शिंदे करत आहेत.

No comments

Powered by Blogger.