Your Own Digital Platform

व्हॉट्स अ‍ॅप संदेश पाच वेळाच पाठवता येणार


सातारा : जगातील सर्वात लोकप्रिय झालेली संदेश वाहिनी म्हणून व्हॉट्स अ‍ॅपची ओळख निर्माण झाली आहे. या माध्यमातून संदेशाबरोबर चित्रे, गाणी, व्हिडीओ व इतर फाईल शहानिशा न करता एकमेकांना शेअर केल्या जातात. मात्र, आता यावर मर्यादा येणार असून व्हॉट्स अ‍ॅपवरून एक संदेश पाच वेळाच फॉरवर्ड करता येणार असल्याने अशा गोष्टींना आता आळा बसणार आहे. दरम्यान, अतिउत्साही नेटकर्‍यांना यामुळे चाप बसणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्स अ‍ॅपवर अफवा पसरवणार्‍या संदेशांचे पेव फुटले. 

त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा व्हॉट्सअ‍ॅपवर वार्‍याच्या वेगाने पसरू नयेत आणि त्यातून अप्रिय घटना घडू नयेत म्हणून मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा कमी करण्याचा विचार व्हॉट्सअ‍ॅप करत आहे. यापुढे व्हॉट्स अ‍ॅप युजर्सना पाचपेक्षा जास्त वेळा एखादा मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अ‍ॅपने फॉरवर्ड मेसेज हे फीचर आणले होते. या फीचरमुळे मूळ मेसेज आणि फॉरवर्ड मेसेज यामधीलफरक ओळखणे सहज शक्य झाले आहे.

आतापर्यंत एखादा व्हिडिओ, फोटो किंवा संदेश मोठ्या प्रमाणात व्हॉट्स अ‍ॅपवर फॉरवर्ड करता यायचे. याचा फायदा होता तसाच तोटाही होता. मात्र, व्हॉट्स अ‍ॅपवर तुफान वेगाने फॉरवर्ड होणार्‍या याच मेसेजमुळे समाजात कित्येक अप्रिय घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपचा गैरवापर रोखण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपने हा निर्णय घेतला आहे. व्हॉट्स अ‍ॅप फॉरवर्ड संदेशांच्या फिचरची नव्याने चाचणी करत आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यावर युजर्स व्हॉट्स अ‍ॅपवर आलेले मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाचपेक्षा जास्त व्यक्तींना फॉरवर्ड करू शकणार नाहीत. पाच व्यक्तींना मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर फॉरवर्ड करण्याची मर्यादा संपेल आणि चॅटवरून हा पर्याय नाहीसा होईल.