Your Own Digital Platform

वैधानिक विकास महामंडळाचे काम आदर्श करणार : ना.योगेश जाधव


फलटण : उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र 17 जिल्ह्यांचे आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदावरुन कार्यासाठी थेट राज्यपाल व मुख्यमंत्री यांचेशी संपर्क असल्यामुळे निधीचा प्रश्‍न येणार नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजनाबाहेरील कामे जी जनतेच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक असतील त्याचा मास्टरप्लॅन करुन आपण त्यासाठी या महामंडळाचे काम ‘मॉडेल’ असंच करणार आहोत, असा आत्मविश्‍वास या महामंडळाचे नूतन अध्यक्ष ना.योगेश जाधव यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष व ना.योगेश जाधव यांच्याबरोबरच काम करणारे राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी कोल्हापूर येथील ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयात जावून त्यांचा विशेष सत्कार केला. त्यावेळी दिलखुलास संवादात ते भरभरुन बोलत होते. 

या पदाला किती मानसन्मान, निधी, प्रोटोकॉल आहे याला महत्त्व न देता आपण जिल्ह्यांच्या मागासभागाच्या विकासासाठी राज्यपाल व मुख्यमंत्री यांचेकडून किती जास्ती निधी आणतो याला मी महत्त्व देणार आहे असे सांगून जाधव म्हणाले, लहान वयात ही जबाबदारी मिळाली असली तरी वडिलांचा आशीर्वाद आणि ‘पुढारी’ वृत्तपत्राची पुण्याई, गावोगावचे नेटवर्क यामुळे ही जबाबदारी आपण सक्षमपणे पेलणार आहोत. अनेक क्षेत्रातील तज्ञांशी आपण चर्चा करत असून प्रश्‍न समजावून घेत आहोत. आजपर्यंत झाले नसेल एवढे काम या महामंडळाकडून स्थायी स्वरुपात करणार आहे. 

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी ही संस्था मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणकार्यासाठी जे काम करीत आहे त्याची माहिती आपल्याला वडिलांकडून आणि अनेक ज्येष्ठ पत्रकारांकडून मला आहे. या कामाबद्दल मला आदर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यास भेट देईन तेव्हा आठवणीने या स्मारकास मी भेट देईन व पोंभुर्ले गावासाठी जे योगदान देता येईल ते नक्की देईन असे आश्‍वानही त्यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त गोविंद बेडकिहाळ, सौ.संपदा बेडकिहाळ उपस्थित होते.