सातारा : नगरपंचायतीला कंटाळून रस्त्यासाठी नागरिकांचा पुढाकार


कराड : मलकापूर (ता. कराड) नगरपंचायत प्रशासन स्टार इंग्लिश मिडियम स्कूलसह मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या तिन्ही शाळांकडे जाणाऱ्या रस्त्याकडे गेली दहा ते बारा वर्षे राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन सातत्याने दुर्लक्ष करत आहे. स्टार इंग्लिश मिडियमसह अन्य शाळांमध्ये एक हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. वारंवार दिलेले अर्ज, निवदेनास केराची टोपली दाखवली जाते, असा दावा माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव थोरात यांनी केला आहे. स्टार इंग्लिश मिडियम स्कूलच्या पालकांनी आज सोमवारपासुन स्वखर्चाने चार लाख खर्च करून रस्त्याचे काम सुरू केले आहे.

सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास अशोकराव थोरात यांच्यासह संदेश शहा, विश्वास चव्हाण, उत्तम जाधव, अल्ताफ शेख, डॉ. स्वाती थोरात यांच्यासह मळाईदेवी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत स्टार इंग्लिश मिडियम स्कूलनजीक रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना खराब रस्त्यामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा मुले पडतात. याशिवाय स्थानिक नागरिकांनाही खराब रस्त्याचा त्रास होतो, असा दावा थोरात यांनी केला आहे. येत्या तीन ते चार दिवसात रस्त्याचे काम पूर्ण होणार असून सुमारे चार लाखांचा खर्च येणार आहे. हा सर्व खर्च पालकांकडून लोकवर्गणी गोळा करून तसेच उर्वरित सर्व खर्च संस्थेमार्फत केला जाणार असल्याचे थोरात यांनी सांगतिले. नगरपंचायत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.

No comments

Powered by Blogger.