Your Own Digital Platform

एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ एकाच वेळी सहायक पोलीस निरीक्षक होणे ही महाराष्ट्रातील पहीली च घटना : दयानंद गावडे


राजुरी : गुणवरे ता. फलटण येथील एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकाच वेळी उत्तीर्ण होऊन सहायक पोलीस निरीक्षक होणे ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचे प्रतिपादन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी केले आहे. 

गुणवरे ग्रामस्थांच्या वतीने गुणवरे येथील कर्मराज गावडे व संग्राम गावडे यांची सहायक पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक निबंधक जे. पी. गावडे, आर. टी. ओ. इन्स्पेक्टर संभाजी गावडे, गुणवरे गावच्या सरपंच सौ. सुलोचना घुले, उपसरपंच तुकाराम गावडे, जावली गावचे सरपंच काशीनाथ शेवते, मुंजवडी गावाचे सरपंच दादा कदम, कमलाकर ठणके, मा. सरपंच गणेश फाळके, दिपक गौंड, विजय गावडे, बाळासाहेब चव्हाण, अजित गावडे, शाहूराज गावडे - पाटील, दिलीप डंगाणे , प्रकाश फडतरे, भानुदास घुले, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

तरूणांनी शिक्षण घेत असताना आपल्या आई वडिलांना गुरूंना अभिमान वाटेल असे काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले पाहिजे. यश मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कामामध्ये येणारे काटे बाजूला करून फुले मिळवण्यासाठी वाटचाल केली पाहिजे. कठोर परिश्रम व सातत्य ठेवल्यास आपल्याला निश्‍चित यश मिळेल यात काही शंका नाही असे प्रतिपादन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी केले. 

यावेळी बाळासाहेब गौंड, शिवाजीराव लंगुटे, जयवंतराव मुळीक, पोलीस पाटील समाधान कळसकर, काशिनाथ शेवते, सत्कार मुर्ती कर्मराज गावडे व संग्राम गावडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक युवराज सांगळे यांनी केले. तर आभार डाॅ. धनंजय आटोळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी गुणवरे, मुंजवडी, राजुरी, गोखळी, निंबळक भागातील ग्रामसथ उपस्थित होते.


पडत्या पावसात कार्यक्रम संपन्न

या सत्कार समारंभाच्या वेळी हलक्याश्या पाऊसाला सुरुवात झाली. पण पडत्या पाऊसात उपस्थित लोक जागेवर बसून होती. कोणीही जागा सोडली नाही. हाच खरा सत्कार मुर्तीचा सत्कार असे ग्रामस्थां मधून चर्चा चालू होती.

गुणवरे ता. फलटण या गावातील प्रशासकीय सेवेत सुमारे 50 पेक्षा जास्त अधिकारी आज पर्यंत भरती झाले आहेत. हीच यशाची परंपरा कायम ठेवावी असे आवाहन दयानंद गावडे यांनी केले.