Your Own Digital Platform

श्रावणी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सायकल व जिम साहित्य भेट


बिजवडी : श्रावणी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संदीपशेठ घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून व ट्रस्टच्या माध्यमातून गोंदवले येथील बहिण-भावाला सायकल, जिम साहित्य व स्पोर्टस्‌ किट देण्यात आले आहे. या साहित्याचे वितरण सागर पोळ, शैलेश जगदाळे, हिरालाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले आहे. माण तालुक्‍यात पाणी फौंडेशन आयोजित जलसंधारणाची कामे सुरू असताना गोंदवले येथील रोहित शंकर बनसोडे, रक्षिता शंकर बनसोडे या दोन बहिण-भावाने इतरांसमोर आदर्श ठेवत कोणी बरोबर येवो अगर न येवोत याची वाट न पाहता जलसंधारणाचे मोठे कार्य केले होते. 

त्यांच्या त्या कार्याचे विविध स्तरातून कौतुक केले जात असताना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या टाकेवाडी, ता.माण येथील श्रावणी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संदीपशेठ घोरपडे व त्यांच्या पत्नी सौ.सुजाता संदीपशेठ घोरपडे या दाम्पत्यांने परिस्थितीने नाजूक असलेल्या या दोन्ही बहिण-भावाला दत्तक घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले होते. श्रावणी ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत अनाथ, गोरगरीब, दिनदलित मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सर्व शैक्षणिक व इतर खर्च करण्यात येतो. अपंग, अनाथ शाळांतील विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा पुरवण्याबरोबर अल्पोपहार, आहारासाठीही तसेच क्रीडा क्षेत्रातील गुणवान विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांनाही त्यांचे ध्येय गाठून देण्यासाठी मदत केली जात आहे.