Your Own Digital Platform

पाटणला मोर्चा, कराडात आंदोलनाची तयारी


पाटण : सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी पाटण तालुक्यातील मराठा समाजातील बांधवांनी पाटण येथील झेंडा चौकातून तहसील कार्यालयावर पायी चालत मोर्चा काढला. मोर्चा पाटण तहसील कार्यालयासमोर आला असता सर्वांनी ठिय्या मांडला आणि सरकारचा निषेध व्यक्त करत आपल्या तीव्र भावना मांडल्या. संघर्षाशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत. त्यासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे. मराठा समाजाचा संयम सुटण्याची वेळ सरकारने पाहू नये. तातडीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. 

आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता रडायची नाही तर लढाईची वेळ आली असल्याचा निर्वाणीचा इशारा पाटण तालुका मराठा मोर्चाच्यावतीने सरकारला देण्यात आला. दरम्यान, पाटण शहरातील दुकानदारांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन मराठा मोर्चाला प्रतिसाद दिला.

शनिवारी सकाळ पासूनच पाटण तालुक्यातील मराठा समाजातील बांधव पाटण शहरातील झेंडा चौकात जमा होत होते. सकाळी 11 वाजता सर्व मराठा बांधव मोर्चाने तहसील कार्यालयाकडे कूच केली. छ. शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. मोर्चा तहसील कार्यालयाजवळ आला असता सर्वांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. याप्रसंगी छ. शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मराठा मुलींच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संजय इंगवले, चंद्रहार निकम, सुरेश नाना पाटील, दिनकर माथणे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या.

पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आणि तहसीलदार रामहरी भोसले यांना मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाचे आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल व खोट्या अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई होणे, शेतकर्‍यांच्या पिकांना हमीभाव देणे, कोपर्डी प्रकरणातील दोषी आरोपींना तात्काळ फाशी देणे आणि महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शासकीय नोकर भरतीत मराठा समाजाचे आरक्षण जाहीर करुनच नोकरभरती करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे शांततेत विसर्जन करण्यात आले. 

या मोर्चात विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ काळे, यशवंतराव जगताप, सुरेश पाटील, धैर्यशील पाटणकर, धनंजय केंडे, चंद्रहार निकम, मंगेश पाटणकर, शंकर मोहिते, गणेश मोरे, गोरख नारकर, अ‍ॅड. अविनाश जानुगडे, शंकरराव मोरे, अनिल भोसले, चंद्रकांत मोरे, लक्ष्मण चव्हाण यांच्यासह पाटण तालुक्यातील मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कराड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येथील विश्राम गृहावर आयोजित केलेल्या बैठकीस कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. समाजबांधवांनी संघटन करून न्याय हक्कासाठी लढा द्यावा. परंतु त्याला कोणत्याही प्रकारचेे गालबोट लावू नये. शांततेच्या मार्गाने लढा दिल्यास त्याला नक्कीच सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.