तीर्थ विठ्ठल... क्षेत्र विठ्ठल..!


सातारा : अवघ्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातून पावसाचा चांगलाच वर्षाव होत आहे. यामुळे अवघा वारकरी व शेतकरी वर्ग आनंदून गेला आहे. त्यामुळे वारकर्‍यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून भावभक्‍तीचा हा पायी दिंडी सोहळा हळूहळू मार्गक्रमण करत आहे. वारकर्‍यांचे तिर्थ विठ्ठल असून क्षेत्रही विठ्ठल झाले आहे ! अवघा माणूसमेळा विठ्ठलमय झाला आहे.

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पुण्यस्पर्शाने आणि संजीवन समाधीच्या स्थानाने पवित्र झालेल्या आळंदीच्या तीर्थक्षेत्रापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर या तीर्थक्षेत्री दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी मोठ्या श्रद्धेने पंढरीची पायी वारी करत असतात. आळंदी ते पंढरी ही पायी वारी करण्याची फार मोठी परंपरा आहे. शेकडो वर्षाचा धार्मिक, सामाजिक वारसा आहे.पंढरीच्या वारीमध्ये वारकरी, फडकरी, दिंडीकरी, ग्रामस्थ, शेतकरी अशा गरीब, श्रीमंत व नोकरदार अशा विविध वर्गातील लोक भाविकतेने सहभागी होत असतात. माऊलींबरोबरचा प्रवास करताना वारकरी ऊन, वारा, पाऊस, सोयी-गैरसोयी यांचा विचार न करता टाळ मृदुंगाच्या साथीने भगवी पताका खांद्यावर घेऊन मुखाने अभंग गात भक्‍तीरसात रंगून जातात.

पालखी किंवा वारी हा जसा एक आध्यात्मिक अविष्कार आहे तसाच तो एकात्मकतेचा विराट लोकप्रवाह आहे. अध्यात्मिक आनंदाबरोबर स्वत:च्या जीवनाला वळण देणारा तो एक संस्कार प्रवाह आहे. ज्या गावात आपल्याला जायचे आहे ते गावच आपण व्हावे. तसेच देवाच्या गावाला जावे आणि स्वत:च्या जीवनात देवाचीच अनुभूती यावी, असा हा वैष्णवांचा आगळावेगळा मार्ग आहे.

वारी ही जीवनातील निष्ठा आहे. या भूमिकेतून वारकरी वारीची अनुभूती घेत असतात. शुद्ध आचार विचारांनी लक्षावधी माणसे स्वत:ला विसरुन विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे वाटचाल करत असतात.

पंढरपूरची वारी ही प्राचीन काळापासून सुरु आहे. पालखी सोहळ्यास ज्यांनी आरंभ केला ते गुरु हैबत बाबा हे आरफळ, ता. सातारा या गावचे होते. त्यांचे घराणे जसे शूर वृत्तीचे तसे धार्मिक वृत्तीचे पण होते. आपल्या माता-पित्यांच्यासोबत बाबांनी पंढरीची वारी केली होती.

पंढरीची पायी वारी केल्याने संसार व्यापातून थोडे दिवस तरी मुक्‍तपणे वेगळ्या शाश्‍वत आनंदाची अनुभूती घेता येते. त्याग वृत्तीने ईश्‍वरसेवा घडते. भौतिक, व्यावहारिक जीवन जगताना वासना व विकार यातून उद्भवणारे मालिन्य नष्ट होते. निसर्गाशी एकरुप जवळीक साधता येते. विविधतेचे दर्शन घडते. संसार, दु:खे सहन करण्याचे सामर्थ्य प्राप्‍त होते. विविध भागातील वेगवेगवेळ्या थरातील भिन्‍न स्वभावाच्या लोकांशी संपर्क येवून त्यांना निरीक्षण शक्‍ती लाभते. सृष्टीमध्ये चराचरात कणाकणात वास करणार्‍या ईश्‍वर भेटीच्या प्रवाहात जीवनाची धन्यता अनुभवता येते. आळंदी, पंढरीचे वारकरी म्हटले तरी लोकांच्या मनात वेगळ्याच प्रकारची आदराची भावना निर्माण होते. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एकदातरी पंढरीची पायी वारी करावी. यामुळे आपणाला प्रत्यक्ष विठ्ठल भेटल्याचा आनंद वारकर्‍यांप्रमाणे निश्‍चितच मिळेल यात शंका नाही.

गेली अनेक वर्षे चालत आलेली आळंदी ते पंढरपूर ही पंढरीची वारी बदलत्या काळामध्ये तिचे रुपही बदलत गेले आहे. बदलत्या काळात वारीचे स्वरुप बदलत असताना श्री संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ‘माऊली’ या शब्दातच सर्वांना सामावून घेण्याची ताकद या वारीच्यानिमित्ताने अनुभवयास मिळते. वारीतील वारकरी आपल्या गावात - घरात यावा याची जणू ओढच वारीच्या वाटेवरील गावकर्‍यांना लागलेली असते. वारीच्या काळात संपूर्ण जीवनच हरिनामाच्या गजरात रंगून जाऊन माऊलीमय होत असते.

वारीला अनेक वर्षांची परंपरा


संत ज्ञानदेवांच्या अगोदरपासून वारीची परंपरा सुरु आहे. श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज, विश्‍वसंत श्री संत तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष विश्‍वंभर बाबा यांनीही वारी चालवली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांनी विखुरलेला वैष्णव समाज एकत्र करुन त्याला संघटित रुप प्राप्‍त करुन दिले. श्री संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायणबुवा यांनी ही वारी सुरु केली तर थोर भक्‍त गुरु हैबतबाबा आरफळकर यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा स्वतंत्ररित्या सुरु केला. 1832 च्या दरम्यान हा सोहळा पालखी स्वरुपात सुरू झाला. सरदार शितोळे यांनी त्यासाठी सहकार्य केले.

No comments

Powered by Blogger.