मुलापाठोपाठ पित्याचीही कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या


म्हसवड :  पानवण, ता. माण येथील शेतकरी व तंटामुक्‍ती कमिटीचे माजी अध्यक्ष नामदेव दशरथ नरळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, गतवर्षी त्यांच्या मोठ्या मुलानेही आत्महत्या केली होती.बरेच दिवस नामदेव नरळे आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्यावर शेतीवरील कर्ज होते. पानवण गावावर कायम दुष्काळाची अवकृपा आहे.

 गावातील बहुतांश शेतकरीवर्गही कारखान्यावर जाऊन ऊसतोड कामगार म्हणून काम करून संसाराचे रहाटगाडगे चालवत असतो. कायमच्या दुष्काळाने शेतकरीवर्ग कर्जात बुडालेला आहे. या घटनेची म्हसवड पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली असून पुढील तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.

नामदेव नरळे अत्यंत मनमिळाऊ व अजातशत्रू असे व्यक्‍तिमत्त्व होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गतवर्षी त्यांचा मोठा मुलगा अशोक नरळे यानेसुद्धा गावानजीकच्या ओढ्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता पित्यानेही आत्महत्या केल्याने पानवण व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments

Powered by Blogger.