रयत-अथणी शुगर्सची साखर सील


कराड : शेवळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील रयत-अथणी शुगर्स थकीत एफआरपी कायद्याच्या कात्रीत सापडला असून एफआरपीच्या वसुलीसाठी महसूल प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सोमवारी कारखान्याच्या गोडाऊनमध्ये असलेली 3 लाख 35 हजार 550 पोती साखर व सर्व उपपदार्थ महसूल प्रशासनाने पंचनामा करून सील केले.

येत्या सात दिवसांत अथणी शुगर्सने एफआरपीनुसार ऊस बिलांची उर्वरित रक्‍कम शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा न केल्यास महसूल विभाग संबंधित मालमत्तांचा लिलाव करणार असल्याची माहिती प्रातांधिकारी हिंमत खराडे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या एफआरपी कायद्यानुसार उसाचे गळीत झाल्यानंतर पंधरा दिवसांत एफआरपीनुसार पहिला हप्ता शेतकर्‍यांना मिळणे कारखान्यावर बंधनकारक आहे. मात्र, रयत-अथणी शुगर्सने फेब्रुवारी महिन्यापासून हंगाम संपेपर्यंतच्या गळीत झालेल्या उसाचे बिल शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. तसेच पीक कर्जाची अंतिम मुदत 30 जून उलटून गेल्याने शेतकर्‍यांना अतिरिक्‍त व्याज भरावे लागले. शिवाय मागील कर्जाची परतफेड न झाल्याने शेतकर्‍यांना सोसायटीकडून वेळेत पिक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता.

बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी कारखाना कार्यस्थळावर आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊस बिल जमा झाल्याशिवाय उठणार नाही असा पावित्रा घेत बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर ठिय्या मांडला. या आंदोलनांची दखल घेत अथणी शुगर्स व्यवस्थापनाने तात्काळ ऊस बिले जमा करण्यासाठी बँकेकडे चेक व पत्र पाठविले. यामध्ये कारखाना 1 फेब्रुवारी ते 28 मार्च पर्यंतची ऊस बिले 2 हजार रुपये प्रतिटन प्रमाणे जमा करणार असून उर्वरित रक्कम आठ दिवसात जमा करणार असल्याचे अथणी शुगर्सचे युनिट हेड देशमुख यांनी सांगितले होते. मात्र या कारखान्याने एफआरपी न दिल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आली आहे.

No comments

Powered by Blogger.