Your Own Digital Platform

काळज येथील पोल्ट्री फार्ममुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न


फलटण : काळज, ता. फलटण येथे गावातच सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याबाबत राजकीय दबाव आणून विरोध करणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीने कारवाई करावी, अन्यथा उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

काळज येथील रविवाशी दत्तात्रय बाबुराव टुले यांच्या घराशेजारी सध्या कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्म) आहे. यातील मृत कोंबड्याची विल्हेवाट योग्यरित्या लावली जात नसल्याने रहिवाशांना त्रास होत आहे. हा पोल्ट्री फार्म हे काळज सोसायटी चेअरमन सुनील गाढवे यांच्या मालकीचा असून ते जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप टुले यांनी केला आहे. 

याबाबत ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे ग्रामस्थांना दुर्गंधीचा, रोगराईचा संसर्ग होण्याची शक्‍यता आहे. शासनातर्फे गावोगावी स्वच्छता अभियान राबवले जात असताना काळज गावात मनमानी सुरू आहे. सरपंच व पोलिसपाटील यांच्याकडेही तक्रार करूनही जे दखल घेत नाहीत. ग्रामपंचायतीने याबाबत तातडीने कारवाई न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दत्तात्रय टुले यांनी दिला आहे.