माऊलींचा सोहळा लोणंदनगरीत विसावला


लोणंद : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका दिवसाच्या मुक्‍कामासाठी लोणंद येथे आगमन झाले. लोणंद नगरपंचायत व लोणंदकर नागरिकांच्या वतीने भक्‍तीमय वातावरणात माऊलींच्या पालखीचे उत्साही स्वागत करण्यात आले. माऊलीच्या आगमनाने संपूर्ण लोणंदनगरीतील वातावरण विठ्ठल नामाच्या गजराने भक्‍तीमय झाले होते. माऊलीच्या पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात दुपारी आगमन केल्यानंतर पाडेगाव ते लोणंद असा प्रवास करत सुमारे दोन तासांत पालखी सोहळा सायंकाळी 4.15 च्या सुमारास दाखल झाला.

लोणंद नगरपंचायतीच्या वतीने माऊलीच्या पालखी सोहळ्याचे स्वागत लोणंद नगरपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके - पाटील , उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके - पाटील, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगरसेवक हणमंत शेळके, विकास केदारी, सचिन शेळके, हेमलता कर्नवर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, मेघा शेळके, किरण पवार, कुसुम शिरतोडे, स्वाती भंडलकर, अ‍ॅड. पी.बी. हिंगमिरे, लीलाबाई जाधव, योगेश क्षीरसागर, दिपाली क्षीरसागर, शैलजा खरात, ऑफिस अधीक्षक शंकरराव शेळके व ग्रामस्थांनी स्वागत केले. माऊलीचा पालखी सोहळा नगरपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने बॅन्ड लावून वाजत गाजत स्टेशन चौक, लक्ष्मी रोड, मार्गे तानाजी चौकात आल्यानंतर रथामधून माऊलीची पालखी बाहेर काढून खांद्यावर घेण्यात आली. यावेळी पालखीला खांदा देण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पालखी विठ्ठल मंदिर, भवानी माता मंदिर

मार्गे लोणंदच्या बाजार तळावर तयार करण्यात आलेल्या पालखी तळावर सायंकाळी 5 च्या सुमारास आली. पालखीतळावर गेल्यानंतर पालखी तळाच्या गोलाकार उभे राहून सोहळ्यातील दिंडीमधील वारकरी टाळ - मृदंगाचा गजर करीत भजन म्हणत होते. तर संपूर्ण पालखीतळ भाविकांनी फुलून गेला होता. त्यानंतर पालखीला सुमारे शंभर मीटर नाचवत तळाच्या मध्यभागी ठेवण्यात आली. चोपदाराने हातातील चोप वर केल्यावर पालखी तळावर एकच शांतता झाली. चोपदारांनी हरवलेल्या वस्तू व सापडलेल्या जिनसा वाचून दाखवल्या. शनिवारी होणार्‍या चांदोबाचा लिंब येथील उभ्या रिंगणादरम्यान वारकर्‍यांनी चपला, पिशव्या मध्यभागी ठेवू नये, चोपदाराने सूचना केल्यावरच उभे रिंगण लावावे, उभे रिंगणाकडे जाताना वारकरी व भाविकांनी डाव्या बाजूने चालणे, वाहने उजव्या बाजूने जातील, अश्‍व पुढे गेल्यावरच वारकर्‍यांनी खेळावे आदी सूचना दिल्या.

समाज आरती झाल्यानंतर माऊलीची पालखी सजवलेल्या ओट्यावर ठेवण्यात आली. तर दिंडीतील वारकरी गटागटाने मुक्कामाच्या ठिकाणी गेले. भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली. माऊलीच्या पालखी सोहळ्याचा लोणंदनगरीतील एकाच मुक्कामानंतर सोहळा शनिवार रोजी दुपारी एकच्या सुमारास तरडगावकडे प्रस्थान ठेवणार आहे. माऊली पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास चांदोबाच्या लिंबाजवळ होणार आहे.

No comments

Powered by Blogger.