डोळ्यात काटा घुसला; पण आरोपी नाही सोडला


सातारा : मंदिरात चोरी केेलेल्या चोरट्यांना पकडताना झालेल्या झटापटीत चोरट्याने घायपाताच्या झाडावर ढकलून दिल्याने त्याचा काटा उजव्या डोळ्यात घुसला. याचवेळी पोलिस दलातील ट्रेनिंग व शपथ डोळ्यासमोर आली. जखमी डोळ्याची तमा न करता तशा अवस्थेत पुन्हा चोरट्यांशी दोन हात करुन त्यांना जेरबंद केल्याची थरारक आठवण निवृत्तीच्या दिवशी पोलिसदादा मारुती इंगवले सांगत होते. दरम्यान, हा अनुभव ऐकत असताना पोलिस दलाची कंट्रोलरुमही शहारुन गेली होती.

सातारा पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून मारुती इंगवले 1980 साली रुजू झाले होते. पहिली चार वर्षे ट्रेनिंग, पोलिस मुख्यालय झाल्यानंतर भुईंज येथे त्यांची पहिली पोस्टींग झाली. 1992 साली भुईंज पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत होते. अमृतवाडी, ता.वाई येथील पद्मावती मंदिर प्रसिध्द आहेे. याठिकाणी चोरट्यांनी पालखीची चोरी केली होती. त्याअगोदर चार दिवसांपूर्वीच जेजुरी येथील मंदिरातही चोरी झाल्याने या दोन्ही घटनांमुळे पुणे व सातारा जिल्ह्यातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सातारचे तत्कालीन पोलिस अधीक्षक माधव सानप यांनी याची गंभीर दखल घेवून अमृतवाडी येथील मंदिरातील चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले.

भुईंज पोलिसांचे एक पथक त्यासाठी नेमण्यात आले. चोरीच्या घटनेची माहिती घेवून पारंपरिक पध्दतीने तपासाला सुरुवात झाली. चोरीनंतर अवघ्या आठ तासातच चोरट्यांची माहिती भुईंज पोलिसांना मिळाली. पाच जणांच्या पोलिस पथकाने भुईंज हद्दीतील माळरान पालथे घालण्यास सुरुवात केली. पहाटेच्या सुमारास चोरट्यांचा सुगावा लागल्यानंतर पोलिस व्हॅनमधून जाणे शक्य नसल्याने त्यांचा थरारक पाठलाग करण्यात आला. चोरटे पुढे व पोलिस मागे अशी परिस्थिती असताना पोलिस हवालदार मारुती इंगवले यांनी एका चोरट्याला गाठले. यावेळी चोरट्याची त्यांनी गचांडी धरली. मात्र, चोरटा तरणाबांड असल्याने त्याने पोलिसाशी झटापट करण्यास सुरुवात केली. झटापटीवेळी परिसरात घायपात ही वनस्पती होती. चोरट्याने ही संधी साधत पोलिस हवालदार मारुती इंगवले यांना त्या घायपातावर पाठीमागून ढकलून दिले. या दुर्घटनेत इंगवले यांचा चेहरा त्यावर आदळला व त्यातच घायपाताचा काटा त्यांच्या उजव्या डोळ्यात घुसला.

घायपाताचा काटा घुसल्याने मारुती इंगवले वेदनांनी कळवले. यावेळी पोलिस दलातील दिले गेलेले ट्रेनिंगही त्यांना आठवले. डोळ्याची तमा न करता बोचणारा काटा त्यांनी हाताने काढला व दुसरा डोळा उघडा ठेवून पुन्हा चोरट्याशी दोन हात केले व त्याला जखडून ठेवले. तोपर्यंत इतर पोलिस आले व मंदिरात चोरी करणारी टोळी पोलिसांच्या हाताला लागली. डोळ्यात घुसलेला काढा काढल्याने इंगवले यांना त्याच्या वेदना होत होत्या. मात्र चोरटे पकडल्याचा आनंद त्यांना झाल्याने त्या रक्‍तबंबाळ अवस्थेत ते पोलिस ठाण्यात गेले. चोरट्यांच्या या झटापटीत आपला डोळा आता जाणार अशीच त्यांनी खूणगाठ बांधली होती. रुग्णालयात जावून उपचार घेतल्यानंतर सुदैवाने मुख्य डोळ्याच्या खाली तो काटा घुसल्याने त्यांचा डोळा शाबूत राहिला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, 1992 साली चोरट्यांशी झालेल्या या झटापटीत डोळ्याखाली घुसलेला हा काटा आयुष्यभरासाठी व्रण स्वरुपात तो राहिला असल्याचे पोलिस हवालदार मारुती इंगवले निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी कंट्रोलरुममध्ये सांगत होते.

यावेळी कंट्रोलरुममधील एक पोलिस अधिकारी, पाच कर्मचारी व मारुती इंगवले यांचे चार कुटुंबिय, मित्रपरिवार असे एकूण दहा सदस्य उपस्थित होेते. कंट्रोलरुममधील पोलिसदादांनी त्यांचा बुके, नारळ व पेढ्याचा पुडा देवून सपत्नीक सत्कार केला. यावेळी उपस्थित पोलिस सहकार्‍यांनी त्यांची काम करण्याची सचोटी कायम लक्षात राहिल असे सांगून निश्‍चित त्याच पध्दतीने पुढे काम करणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.

No comments

Powered by Blogger.