Your Own Digital Platform

ठोसेघर धबधब्याची पर्यटकांना साद


सातारा : सातार्‍याच्या पश्चिमेकडील गेले पंधरा दिवस पडत असलेल्या जोरदार पावसाने कास, ठोसेघर परिसर हिरवाईने नटला असून दाट धुक्यात हा परिसर हरवून गेला आहे. डोंगरकपारीतील हा परिसर चिंब भिजून निघाला असून पर्यटकांना साद घालू लागला आहे. ठोसेघर धबधबाही धो-धो कोसळू लागल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

सुमारे तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कड्याकपारीचे रुपडे पालटू लागले आहे. हिरवाईने हा परिसर नटू लागला असल्याने तरुणाईची पावले यादिशेने वळू लागली आहेत. कास पठारासह ठोसेघर, भांबवली वजराई, नवजा, ओझर्डे, लिंगमळा येथील धबधब्यासह पाचगणी, महाबळेश्वरकडे जाणार्‍या मार्गावरील छोटे-मोठे धबधबे फेसाळू लागले आहेत. या धबधब्यात भिजण्यासाठी तरुणाई जणू सज्ज झाली आहे. या परिसरात तरुण-तरुणींची गर्दी होऊ लागली आहे. डोंगर कपारीत कोसळणारे छोटे-मोठे धबधबे आकर्षित करू लागले आहेत. धुक्याची दुलई पांघरलेला हा परिसर आल्हाददायक ठरू लागला असून दाट धुक्यात आणि रिमझिम पावसात भिजण्याची अनोखी मजा लुटण्यासाठी युवावर्ग संधीची वाट पहात आहे. महाबळेश्वर, पाचगणी अशा जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांचा समावेश असलेल्या सातारा जिल्ह्यात अलीकडच्या काही

वर्षात अजूनही नवि पर्यटनस्थळे उदयास येत आहेत. मात्र, हुल्लडबाजी, शिस्तीचा अभाव, सुरक्षितता आदि कारणास्तव या पर्यटनस्थळांना गालबोट लागत आहे. या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे.