Your Own Digital Platform

पीक विमा योजनेचे अर्जही आता ऑनलाईन


औंध : शासनाने सर्व कामे ऑनलाईन केली. लिंक राहात नसल्याने प्रत्येक कामाचा बट्टयाबोळ होत असताना आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्जदेखील ऑनलाईन भरावा लागणार आहे. अर्ज भरण्याकरिता हातची कामे सोडून अन्य ठिकाणी जाण्याची वेळ पुन्हा एकदा शेतकर्‍यांवर आली असून यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज 20 रुपयांना देण्यात येत असून त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. शासनाने शेती व शेतीसंदर्भातील योजनांकरिता ऑनलाईन प्रक्रिया पुढे केली. ही प्रक्रिया सर्वसामान्यांना कळत नाही. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता प्रत्येक वेळी दुसर्‍याची मदत घ्यावी लागते. त्या मदतीकरिता वेळप्रसंगी पैसेही मोजावे लागतात. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून देणार्‍या व्यक्‍तीने योग्य पद्धतीने माहिती भरली तर लाभ मिळतो. चूक केली तर लाभापासून वंचित व्हावे लागते.

त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज भरावा लागतो. याचा प्रत्यय अनेक शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषीकर्ज सन्मान योजनेवेळी अर्ज भरताना आला होता. आधीच पीक विम्याची रक्‍कम अनेकांना मिळालेली नाही. त्यामुळे पीक विम्याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली आहे.

अशातच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेऊ पाहणार्‍यांकरिता ऑनलाईन प्रक्रिया मनस्तापाचे कारण बनत आहे. विमा काढण्याकरिता भरावा लागणारा अर्ज हा सेतू किंवा खासगी संगणक केंद्रामधून भरावयाचा आहे. त्यासोबत आधारकार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक, लावलेल्या पिकाचे क्षेत्र आदी अर्जात नमूद करायचे आहे. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर शेतकर्‍याला विम्याची रक्‍कम सांगण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकर्‍याला पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना द्यावे लागेल. त्याचा नमुना सेतू केंद्रात उपलब्ध करण्यात आला आहे.

शासनाने पीक विमा योजनेमध्ये नाशवंत भाजीपाला, फळ उत्पादने तसेच खर्चिक पिकांचाही समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या पीक विमा योजनेतून फक्त महसूल गोळा केला जातो.